पंतप्रधान मोदींसोबत कारमध्ये काय चर्चा झाली? पुतिन यांनी सांगितला चीनमधील 'तो' किस्सा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 16:16 IST2025-12-04T16:15:12+5:302025-12-04T16:16:09+5:30
India-Russia : पीएम मोदी आणि पुतिन भेटीत संरक्षण, व्यापार, ऊर्जा, शिक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये चर्चा होईल.

पंतप्रधान मोदींसोबत कारमध्ये काय चर्चा झाली? पुतिन यांनी सांगितला चीनमधील 'तो' किस्सा...
India-Russia : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन आज(दि.4) सायंकाळी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. तत्पुर्वी त्यांनी पीएम मोदींसोबत कारमधील प्रवासाची माहिती दिली. चीनमधील तियानजिन येथे झालेल्या 25व्या शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषदेदरम्यान दोन्ही नेत्यांनी एकाच कारमधून प्रवास केला होता, त्याची जगभरात चर्चा झाली होती.
कारमध्ये खूप गप्पा मारल्या...
इंडिया टुडे ग्रुपला दिलेल्या मुलाखतीत पुतिन म्हणाले, कोणतीही पूर्वतयारी नव्हती, ते सहज घडले. आम्ही दोघे बाहेर पडलो आणि समोर माझी कार दिसली. मी मोदींना म्हटले, चला, एकत्र जाऊ. त्यापलीकडे यात काही विशेष नव्हते. या प्रवासात आम्ही नेहमीप्रमाणे मित्रांसारखे संवाद करत होतो. आमच्याकडे नेहमी चर्चा करण्यासारखे अनेक विषय असतात. आम्ही इतके गप्पांत रमलो की, लोक आमची वाट पाहत आहेत, हेही लक्षात आले नाही.
नरेंद्र मोदी कुणासमोर झुकत नाहीत
पीएम मोदींच्या नेतृत्वाबद्दल बोलताना रशियन राष्ट्राध्यक्ष म्हणाले की, नरेंद्र मोदी कुणाच्याही दबावाखाली झुकणारे नेते नाहीत. अमेरिका भारतावर टॅरिफच्या माध्यमातून दबाव आणत असल्याच्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर पुतिन यांनी हा मोठा विधान केला आहे. पुतिन पुढे म्हणतात, जगाने भारताची ठाम आणि स्पष्ट भूमिका पाहिली आहे. भारताने आपल्या नेतृत्वाचा अभिमान बाळगवा. भारत-रशियामधील 90% पेक्षा जास्त द्विपक्षीय व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहेत, ज्यातून दोन्ही देशांमधील आर्थिक आणि रणनीतिक भागीदारी किती स्थिर आहे, हे दिसून येते.
भारताने 77 वर्षांत मोठी झेप घेतली
पुतिन यांनी भारत-रशिया संबंधांच्या ऐतिहासिक आणि अनोख्या स्वरुपाचा उल्लेख करत सांगितले की, चर्चेसाठी असंख्य विषय आहेत. प्रामुख्याने संरक्षण, व्यापार, ऊर्जा, शिक्षण आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये सहकार्यावर चर्चा होईल. भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या प्रगतीबद्दल बोलताना ते म्हणाले, केवळ 77 वर्षांत भारताने उल्लेखनीय विकास साधला आहे. हा कालखंड इतिहासाच्या दृष्टीने मोठा नाही, पण भारताची प्रगती विलक्षण आहे.