'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 20:06 IST2025-05-02T20:05:56+5:302025-05-02T20:06:38+5:30
India Pakistan Tension: भारत आपल्यावर कधीही हल्ला करू शकतो, या भीतीने पाकिस्तान घाबरला आहे.

'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
Pahalgam Terror Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात पाकिस्तानविरोधात संतापाची लाट आहे. सामान्य लोकांपासून ते राजकारण्यांपर्यंत, सर्वजण पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाईची मागणी करत आहेत. संपूर्ण देश एकसुरात पाकिस्तानात घुसून हल्ला करण्याची आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) भारतात परत आणण्याची मागणी करत आहे.
दोन महिन्यांचा रेशनचा साठा करण्याचे निर्देश
दरम्यान, भारत सरकारने घेतलेल्या कठोर निर्णयांमुळे पाकिस्तान घाबरला आहे. भारत आपल्यावर कधीही हल्ला करू शकतो, या भीतीने पाक सरकारने पाकव्याप्त काश्मीरमधील सीमेजवळ राहणाऱ्या लोकांना दोन महिन्यांचे राशन साठवण्याचे आवाहन केले आहे. वृत्तसंस्था एएफपीच्या वृत्तानुसार, पीओकेचे पंतप्रधान चौधरी अन्वरुल हक यांनी विधानसभेत सांगितले की, 13 मतदारसंघांमध्ये दोन महिन्यांसाठी अन्नसाठा साठवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
1 अब्ज रुपयांचा आपत्कालीन निधी तयार
या 13 मतदारसंघांमध्ये अन्न, औषधे आणि इतर सर्व मूलभूत गरजा पुरवण्यासाठी 1 अब्ज रुपयांचा आपत्कालीन निधी देखील तयार करण्यात आला आहे. नियंत्रण रेषेवरील भागातील रस्त्यांच्या देखभालीसाठी सरकारी आणि खाजगी यंत्रणा देखील तैनात केल्या जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
भारताच्या कारवाईने पाकिस्तान घाबरला
पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी अलीकडेच म्हटले की, भारत हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे विश्वसनीय पुरावे त्यांच्याकडे आहेत. या भीतीमुळे पीओकेमधील पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी गुरुवारी 10 दिवसांसाठी 1000 हून अधिक धार्मिक शाळा बंद ठेवल्या आहेत.