भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 17:58 IST2025-08-25T17:57:24+5:302025-08-25T17:58:21+5:30
India-Pakistan: परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ही मदत पूर्णपणे मानवतेच्या आधारावर करण्यात आली आहे.

भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
India-Pakistan:भारताने नेहमीच आपल्या शेजाऱ्यांबद्दल मोठे मन ठेवले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध बिघडले, मात्र आता पाकिस्तानमधील नागरिकांसाठी भारताने मोठे पाऊल उचलले आहे. सध्या सर्वत्र जोरदार पाऊस पडोय, ज्यामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. भारताने जम्मू-काश्मीरमधील संभाव्य पुराबाबत पाकिस्तानला माहिती दिली आणि सतर्क केले. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ही माहिती पूर्णपणे मानवतेच्या आधारावर शेअर करण्यात आली आहे.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी करार अनिश्चित काळासाठी स्थगित केला. यामुळे भारत आता पाकिस्तानला पाण्याच्या प्रवाहाचा डेटा आणि तांत्रिक माहिती देण्यास बांधील नाही. मात्र, आता मानवतेच्या आधारावर भारताने पाकिस्तानला पुराबाबत महत्वाची माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानात आलेल्या विविध पुरांमुळे अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामुळेच भारताने पाकिस्तानची मदत केली आहे.
उच्चायुक्तांशी पहिल्यांदाच संपर्क
अशा विषयावर संवाद साधण्यासाठी उच्चायुक्ताच्या माध्यमाचा वापर करण्याची ही पहिलीच वेळ होती. इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्ताने रविवारी या प्रकरणाची माहिती पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाला दिली. सहसा पूर्वी सिंधू पाणी करारांतर्गत अशी माहिती शेअर केली जात असे. परंतु हा करार स्थगित करण्यात आल्यामुळे उच्चायुक्ताच्या माध्यमातून माहिती शेअर केली.
तावी नदीबाबत अलर्ट
भारताने पाकिस्तानला तावी नदीतील संभाव्य पुराच्या धोक्याबद्दल सतर्क केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तावी नदीची पाण्याची पातळी झपाट्याने वाढली आहे. अहवालानुसार, भारताकडून माहिती मिळाल्यानंतर पाकिस्तानने आपल्या नागरिकांना पुराचा इशारा दिला. तसेच, सखल भागातील लोकांना इतर सुरक्षित ठिकाणी हलवले जात आहे.