वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 16:23 IST2025-10-27T16:22:38+5:302025-10-27T16:23:16+5:30
Zakir Naik Bangladesh Visit: बांगलादेशच्या अंतरिम सरकारने झाकीर नाईकला देशभरात प्रचार करण्याची परवानगी दिली

वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
Zakir Naik Bangladesh Visit: भारतात मोस्ट वॉन्टेड असलेला वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईक याच्यासाठी बांगलादेशमध्ये पायघड्या घालण्यात आल्या आहेत. मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेशच्या अंतरिम सरकारने वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईक याला देशभरात प्रचार करण्याची परवानगी दिली आहे. युनूस सरकारने झाकीर नाईकला एका महिन्यासाठी देशात राहण्याची परवानगी दिली आहे. त्याचा हा दौरा २८ नोव्हेंबर ते २० डिसेंबर २०२५ असा असणार आहे. या काळात तो बांगलादेशच्या विविध भागात धार्मिक प्रचार करताना दिसणार आहे. हा त्याचा बांगलादेशचा पहिलाच दौरा असेल.
पीस टीव्हीवर बंदी
जुलै २०१६ मध्ये ढाका येथील होली आर्टिसन बेकरी दहशतवादी हल्ल्यानंतर झाकीर नाईकच्या पीस टीव्ही चॅनेलवर बंदी घालण्यात आली होती. तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांनी हा निर्णय घेतला होता. पण त्या सरकारच्या धोरणांपेक्षा सध्या घेतलेला निर्णय फारच वेगळा आहे. हल्ल्यानंतर काही तासांतच झाकीर नाईक भारतातून पळून गेला होता. कारण हल्लेखोरांपैकी एकाने बांगलादेशी तपासकर्त्यांना सांगितले की तो नाईकच्या यूट्यूब चॅनेलवरील भाषणांनी प्रभावित झाला होता.
२०१६ पासून भारतातून फरार
झाकीर नाईक २०१६ पासून फरार आहे आणि त्याच्यावर भारतात द्वेष पसरवण्याचा आणि सांप्रदायिक सलोखा बिघडवण्याचा आरोप आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) त्याच्याविरुद्ध बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायदा आणि भारतीय दंड संहितेअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. झाकीर नाईक २०१६ पासून मलेशियात राहत आहे. भारताने वारंवार नाईकच्या प्रत्यार्पणाची विनंती केली आहे, परंतु मलेशियाने नकार दिला आहे. बांगलादेशपूर्वी पाकिस्ताननेही झाकीर नाईकचा पाहुणचार केला होता. बांगलादेशही आता तेच करण्याची योजना आखत आहे.