Video: पंतप्रधान नेतन्याहूंचे पीएम मोदींना खास सरप्राइज; 'मोदी जॅकेट' घालून केले स्वागत...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 11:41 IST2026-02-26T11:40:10+5:302026-02-26T11:41:39+5:30
India-Israel Relation: इस्रायलच्या संसदेत पीएम मोदींचे संबोधन; भारत-इस्रायल संबंधांवर टाकला प्रकाश!

Video: पंतप्रधान नेतन्याहूंचे पीएम मोदींना खास सरप्राइज; 'मोदी जॅकेट' घालून केले स्वागत...
India-Israel Relation: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या इज्रायलच्या दौऱ्यावर असून, त्यांनी इस्रायली संसदेच्या विशेष अधिवेशनाला संबोधित केले. या भाषणासह पंतप्रधान मोदी नेसेटला संबोधित करणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. नेसेटमध्ये आगमनावेळी सभापती अमीर ओहाना यांनी पंतप्रधान मोदींचे औपचारिक स्वागत केले. यावेळी त्यांना ‘स्पीकर ऑफ द नेसेट’ पदकाने सन्मानित करण्यात आले.
आपल्या भाषणाची सुरुवात करताना पंतप्रधान मोदी यांनी या विशेष सन्मानाबद्दल आभार व्यक्त केले आणि हा पुरस्कार भारत व इस्रायलमधील शाश्वत मैत्री आणि सामायिक लोकशाही मूल्यांना समर्पित असल्याचे नमूद केले.
भारत-इस्रायल भागीदारीवर सविस्तर भाष्य
पंतप्रधान मोदींनी आपल्या संबोधनात भारत आणि इस्रायलमधील प्राचीन संबंधांचा उल्लेख करत आधुनिक काळातील मजबूत भागीदारीवर प्रकाश टाकला. तंत्रज्ञान, इनोव्हेशन, संरक्षण, सुरक्षा आणि रणनीतिक समन्वय या क्षेत्रांतील सहकार्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कृषी, ग्रामीण विकास, जलव्यवस्थापन, शाश्वत विकास आणि उद्योजकता या क्षेत्रांतील सहकार्यामुळे दोन्ही देशांतील जनतेमधील नाते नव्या उंचीवर पोहोचल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
हमारे संयुक्त रात्रिभोज से पहले, मैंने अपने मित्र प्रधानमंत्री मोदी को पारंपरिक भारतीय परिधान पहनकर चौंका दिया। 🇮🇱🇮🇳@narendramodipic.twitter.com/3ElIQeLY97
— Benjamin Netanyahu - בנימין נתניהו (@netanyahu) February 25, 2026
दहशतवादाविरोधात इस्रायलला भारताचा ठाम पाठिंबा
दहशतवादाच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदी यांनी भारत आणि इस्रायलची ‘झिरो टॉलरन्स’ नीती पुन्हा एकदा ठामपणे मांडली. 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर त्यांनी तीव्र संवेदना व्यक्त करत, अशा क्रूर आणि अमानवी कृत्यांना कोणत्याही परिस्थितीत समर्थन देता येणार नाही, असे स्पष्ट शब्दांत सांगितले. प्रदेशात दीर्घकालीन शांतता व स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी होणाऱ्या सर्व प्रयत्नांना भारताचा पूर्ण पाठिंबा राहील, अशी ग्वाहीही पंतप्रधान मोदी यांनी दिली.
नेतन्याहूचे पीएम मोदींना खास सरप्राइज
दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासोबतच्या संयुक्त रात्रिभोजापूर्वी पारंपरिक भारतीय पोशाख परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. नेतन्याहू यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर याचा व्हिडीओ शेअर करत हिंदीत पोस्ट लिहिली की, आमच्या डिनरपूर्वी मी माझे मित्र पंतप्रधान मोदी यांना पारंपरिक भारतीय पोशाख परिधान करून आश्चर्यचकित केले. या व्हिडिओत नेतन्याहू यांनी पांढऱ्या रंगाचा फुल स्लीव्ह शर्ट, त्यावर हलक्या राखाडी रंगाचे भारतीय 'मोदी' जॅकेट घातलेले दिसते.