"भारत नशीबवान आहे की, त्यांना मोदींसारखा नेता मिळाला"- व्लादिमीर पुतिन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 08:04 IST2025-12-05T08:03:39+5:302025-12-05T08:04:18+5:30
Vladimir Putin On Narendra Modi: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान मोदींचे भरभरून कौतुक केले.

"भारत नशीबवान आहे की, त्यांना मोदींसारखा नेता मिळाला"- व्लादिमीर पुतिन
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन गुरुवारी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले. या भेटीदरम्यान पुतिन यांनी भारत-रशिया संबंधांना अधिक उंचीवर नेण्याची ग्वाही दिली. तसेच त्यांनी पंतप्रधान मोदींचे भरभरून कौतुक केले.
पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करताना राष्ट्राध्यक्ष पुतिन म्हणाले की, "भारत आणि रशियाचे खूप विश्वासार्ह आणि मैत्रीपूर्ण संबंध आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खूप विश्वासार्ह व्यक्ती आहेत, हे मी अगदी प्रामाणिकपणे बोलत आहे. भारताला मोदींसारखा नेता मिळाला, हे त्यांचे भाग्य आहे. ते फक्त देशासाठी जगतात आणि देशासाठीच श्वास घेतात."
भारत- रशियातील व्यापार असमतोल कमी करण्यावर भर
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी दोन्ही देशांमधील व्यापार असमतोल कमी करण्यावर भर दिला. ते म्हणाले की, "रशिया भारताकडून अधिक वस्तू खरेदी करण्यासाठी नवीन पर्याय शोधत आहे, ज्यामुळे भारतीय आयात वाढेल आणि व्यापारातील असमतोल कमी होण्यास मदत होईल."
मोदी-शी जिनपिंग हुशार नेते
आंतरराष्ट्रीय संबंधांवर बोलताना पुतिन यांनी भारत आणि चीन या दोन्ही देशांना जवळचे मित्र म्हटले. त्यांनी पंतप्रधान मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे वर्णन हुशार नेते म्हणून केले. ते म्हणाले की, "हे दोन्ही नेते कठीण परिस्थितीत योग्य निर्णय घेण्यासाठी ओळखले जातात."