"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 15:14 IST2025-05-03T15:14:18+5:302025-05-03T15:14:52+5:30
पहलगाम हल्ल्यानंतर, भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला असतानाच ख्वाजा आसिफ यांचे हे विधान आले आहे...

"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी
भारताने सिंधू नदीवर धरण बांधले तर पाकिस्तान त्यावर हल्ला करेल, अशी पोकळ धमकी पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी दिली आहे. एवढेच नाही तर, एका टीव्हीला मुलाखत देताना, आक्रमकता केवळ गोळ्यांद्वारे नसते, तर पाणी अडवणे हा देखील हल्लाच आहे, असेही आसिफ यांनी म्हटले आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर, भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला असतानाच ख्वाजा आसिफ यांचे हे विधान आले आहे. १९६० मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात जागतिक बँकेच्या मध्यस्थीने झालेला आयडब्ल्यूटी (सिंधू पाणी करार) हा आजपर्यंतचा जगातील सर्वात यशस्वी जल करार मानला जातो. या करारानुसार, भारताला पूर्वेकडील नद्यांवर (रावी, बियास, सतलज) नियंत्रण देण्यात आले, तर पाकिस्तानला पश्चिमेकडील नद्यांवर (सिंधू, झेलम, चिनाब) अधिक अधिकार मिळाला.
भारताल आंतरराष्ट्रीय पातळीवर अपेक्षित समर्थन मिळालेले नाही, असे पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांना वाटते. भारताचे आरोप आंतरराष्ट्रीय पातळीवर फेटाळण्यात आले असल्याचा त्यांचा दावा आहे. तसेच, मोदी सरकारकडे आपले दावे सिद्ध करण्यासाठी कसलेही पुरावे नाहीत, असेही आसिफ यांनी म्हटले आहे.
भारत शस्त्राप्रमाणे करतोय पाण्याचा वापर -
तत्पूर्वी, भारत पाण्याचा वापर शस्त्राप्रमाणे करत आहे. मात्र आम्हाला भारतासोबत युद्ध करायचे नाही. जर युद्धाची स्थिती निर्माण झालीच, तर पाकिस्तानही प्रत्युत्तर देईल. तसेच सिंधू पाणी करारासंदर्भात पाकिस्तान जागतिक बँकेचा दरवाजा ठोठावेल, असेही ख्वाजा आसिफ यांनी म्हटले होते.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताची कठोर भूमिका -
पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांच्या मृत्यू झाला होता. यानंतर, भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई केली आहे. आयडब्ल्यूटी रद्द करण्यासोबतच, भारताने पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा देखील रद्द केले आहेत आणि वाघा-अटारी सीमाही बंद केली आहे.