भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 01:11 IST2025-05-11T01:10:55+5:302025-05-11T01:11:58+5:30
India-Pakistan Ceasefire: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी देशवासियांना संबोधित करताना हा आपला विजय असल्याचा दावा केला. मात्र भारताने आक्रमक कारवाई करत आमची शस्त्रास्त्रे आणि सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, अशी कबुलीही शरीफ यांनी दिली.

भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, शनिवारी संध्याकाळी अमेरिकेच्या मध्यस्तीने भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धविराम जाहीर झाला. त्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी देशवासियांना संबोधित करताना हा आपला विजय असल्याचा दावा केला. मात्र भारताने आक्रमक कारवाई करत आमची शस्त्रास्त्रे आणि सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, अशी कबुलीही शरीफ यांनी दिली. मात्र आता आम्हाल भारतासोबत युद्धविराम हवा असून, भारतासोबत चर्चा करण्याची आमची इच्छा आहे, असा दावाही शाहबाज शरीफ यांनी केला.
दोन तीन दिवस एकमेकांवर जोरदार ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केल्यानंतर भारत आणि पाकिस्तान युद्धविरामासाठी राजी झाले होते. तसेच शनिवारी संध्याकाळी ५ वाजल्यापासून युद्धविराम लागूही झाला. होता युद्धविराम लागू झाल्यानंत देशवासियांना संबोधित करताना शाहबाज शरीफ यांनी हा आपला विजय असल्याचा दावा केला. मात्र भारताने केलेल्या आक्रमक कारवाईत पाकिस्तानचं जबर नुकसान झाल्याचंही त्यांनी मान्य केलं. देशवासियांना संबोधित करताना शाहबाज शरीफ म्हणाले की, भारताने आमची लष्करी हत्यारे नष्ट केली. लष्करी तळ उद्ध्वस्त केले. तसेच भारताने केलेल्या कारवाईत आमचे अनेक सैनिक आणि सर्वसामान्य लोक मारले गेले, असे शरीफ म्हणाले.
त्यांनी पुढे सांगितले की, आम्हाला भारतासोबत युद्ध नको आहे. आम्हाला युद्धविराम हवा आहे. दरम्यान, भारतासोबत झालेल्या युद्धविरामासाठी शाहबाज शरीफ यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, तसेच सौदी अरेबिया, तुर्कीए आणि कतार आदी देशांच्या प्रमुखांचे आभार मानले. तसेच पाकिस्तानचा खास मित्र असा उल्लेख करत शाहबाज शरीफ यांनी चीन आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांचेही आभार मानले.