पाकला नव्हे, चीनला धोका मानतो भारत; पाकिस्तानला अस्तित्वाचीच खरी भीती असल्याचेही अहवालात नमूद
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 06:18 IST2025-05-26T06:16:46+5:302025-05-26T06:18:01+5:30
पाकिस्तानला अंतर्गत बंडाळीमुळे आता आपल्या अस्तित्वाचीच खरी भीती असल्याचेही अहवालात नमूद

पाकला नव्हे, चीनला धोका मानतो भारत; पाकिस्तानला अस्तित्वाचीच खरी भीती असल्याचेही अहवालात नमूद
वॉशिंग्टन :भारत पाकिस्तानला नव्हे, तर चीनलाच आपला खरा धोका मानतो. तर, पाकिस्तान म्हणजे सहज नियंत्रण मिळवता येईल अशी सुरक्षाविषयक समस्या असल्याचे भारताला वाटते. अमेरिकी गुप्तचरांच्या जागतिक धोक्याच्या दृष्टीने तयार करण्यात आलेल्या मूल्यांकन अहवालात भारतीय उपखंडातील ही स्थिती मांडली आहे.
पाकिस्तानला अंतर्गत बंडाळीमुळे आता आपल्या अस्तित्वाचीच खरी भीती असल्याचेही अहवालात नमूद आहे. या अहवालात अमेरिकेने चीनचे विस्तारवादी धोरण व भारतासमोर असलेली सामरिक आव्हाने याबाबत चिंता व्यक्त केली आहे.
काय तयारी करतोय भारत?
आगामी काळात भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संरक्षणविषयक धोरण त्यांचे जागतिक नेतृत्व अधिक भक्कम करण्यासह चीनचा सामना करण्याच्या दृष्टीने लष्करी शक्ती वाढवण्यावरच केंद्रित असेल, असे यात नमूद आहे.
चीनच्या कुरापती भारतासाठी अडचण
चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने म्यानमार, पाकिस्तान आणि श्रीलंकेसारख्या भारताच्या शेजारी देशांत लष्करी तळ उभारण्याबाबत विचार सुरू केला आहे. यात चीन यशस्वी झाला तर भारतासाठी हा गंभीर सामरिक धोका ठरू शकतो. कारण, या सर्वच देशांच्या सीमा भारताला लागून आहेत, असे हा अहवाल सांगतो.
तणाव कमी, पण सीमाप्रश्न कायम
चीन सीमेवर असलेला तणाव सध्या कमी झाला असला तरी या देशाशी लागून असलेल्या भारतीय सीमांचा प्रश्न मात्र अजूनही कायम आहे. लडाखच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील वादग्रस्त भागांतून सैन्य मागे घेण्यावर दोन्ही देशांत सहमती झाली आहे. तरीही सीमावाद मात्र सुटलेला नाही. यावर अहवालात विशेष भर देण्यात आल्याचे दिसून येते.