भारतानं अफगाणिस्तानात केलेल्या कोट्यवधींच्या गुंतवणुकीचं काय? तालिबानचं स्पष्ट अन् थेट उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 15:46 IST2021-08-17T15:46:17+5:302021-08-17T15:46:45+5:30
भारतीय कंपन्यांची तालिबानमध्ये मोठी गुंतवणूक; शेकडो प्रकल्पांची कंत्राटं भारतीय कंपन्यांकडे

भारतानं अफगाणिस्तानात केलेल्या कोट्यवधींच्या गुंतवणुकीचं काय? तालिबानचं स्पष्ट अन् थेट उत्तर
काबुल: दहशतवादी संघटना तालिबाननं संपूर्ण अफगाणिस्तानवर कब्जा केला आहे. अफगाणिस्तानात तैनात असलेलं अमेरिकन सैन्य माघारी परतताच तालिबाननं आक्रमक कारवाया सुरू केल्या. आता संपूर्ण देशावर तालिबानचा अंमल आहे. त्यामुळे देशातील जनता दहशतीखाली आहे. लाखो लोक देश सोडून पळण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातच आता तालिबाननं भारताबद्दलची आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
तालिबान कोणत्याही देशाला अफगाणिस्तानची जमीन दुसऱ्या देशावर कारवाई करण्यासाठी वापरू देणार नाही, असं तालिबानच्या प्रवक्त्यांना सांगितलं. पाकिस्तानच्या हम वृत्तवाहिनीला सोमवारी रात्री तालिबानचे प्रवक्ते सुहेल शाहीन यांनी मुलाखत दिली. राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांचं सरकार कोसळल्यानंतर पहिल्यांदाच तालिबाननं आपली विविध मुद्द्यांवरील भूमिका स्पष्ट केली.
भारताची अफगाणिस्तानात मोठी गुंतवणूक आहे. संपूर्ण देशात भारतीय कंपन्या विविध प्रकल्पांवर काम करत आहेत. तालिबानमुळे ही सर्व गुंतवणूक धोक्यात आल्याची चर्चा आहे. त्यावर सुहेल शाहीन यांनी तालिबानची भूमिका मांडली. 'भारत अफगाणिस्तानात विविध प्रकल्पांवर काम करत आहे. विविध विकास प्रकल्प, मुलभूत सुविधा उभारण्याचं काम सुरू आहे. भारत हे अर्धवट राहिलेले प्रकल्प पूर्ण करू शकतो. कारण ते लोकांसाठी आहेत,' असं शाहीन म्हणाले.
आमच्या भूमीचा वापर कोणत्याही देशानं इतर राष्ट्रांवर कारवाई करण्यासाठी करू नये. आम्ही ते सहन करणार नाही. आमच्या धोरणात ही गोष्ट बसत नाही, असं शाहीन यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं. भारताची अफगाणिस्तानसोबत चर्चा सुरू आहे. भारतानं तालिबानच्या सत्तेला मान्यता दिलेली नाही. भारतीय दूतावासातील कर्मचाऱ्यांना सरकारनं माघारी बोलावलं आहे.