भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 01:23 IST2025-04-28T01:23:08+5:302025-04-28T01:23:41+5:30
India France, Rafale-M jets: या विमानांची किंमत सुमारे ६३ हजार कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.

भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
India France, Rafale-M jets: भारत आपली लष्करी क्षमता सतत वाढवत आहे. या संदर्भात, आज (२८ एप्रिल) भारत आणि फ्रान्समध्ये नौदलासाठी राफेल मरीन (एम) लढाऊ विमाने खरेदी करण्यासाठी करार होणार आहे. या करारांतर्गत भारतीय नौदलाला २६ राफेल-एम लढाऊ विमाने पुरवली जाणार आहेत. यामध्ये २२ सिंगल-सीटर आणि ४ ट्विन-सीटर ट्रेनिंग व्हर्जनचा समावेश असेल. नौदलाला पुरवण्यात येणारी ही लढाऊ विमाने भारतीय विमानवाहू जहाजे, आयएनएस विक्रमादित्य आणि स्वदेशी बनावटीच्या INS विक्रांतमधून चालवली जातील. ही विमाने भारतीय सागरी सीमेच्या सुरक्षेसाठी गेम चेंजर ठरतील. या विमानांची किंमत सुमारे ६३ हजार कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.
दिल्लीत होणार सोहळा
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा करार भारत आणि फ्रान्सच्या संरक्षण मंत्र्यांकडून व्हर्च्युअल माध्यमातून केला जाईल. दिल्ली येथे होणाऱ्या या समारंभाचे अध्यक्षस्थान फ्रेंच राजदूत आणि भारताचे संरक्षण सचिव करतील. फ्रान्सचे संरक्षण मंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चेत सहभागी होतील आणि स्वाक्षरी केल्या जातील. या समारंभात भारतीय संरक्षण सचिव राजेश कुमार आणि फ्रेंच राजदूत थिएरी माथू देखील उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
भारतीय नौदलाचे सामर्थ्य वाढणार
हा करार भारतीय नौदलासाठी खूप प्रभावी ठरेल. यामुळे सैन्याची ताकद वाढेल. या विमानांच्या खरेदीमुळे सागरी हल्ल्यांमध्ये नौदलाची ताकद अनेक पटींनी वाढेल. राफेल-एम विमानांची डिलिव्हरी २०२८-२९ पासून सुरू होईल आणि सर्व विमानांचा पुरवठा २०३१-३२ पर्यंत पूर्ण होईल अशी माहिती आहे. अलीकडेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीने (CCS) नौदलासाठी फ्रान्सकडून २६ राफेल-एम लढाऊ विमाने खरेदी करण्यास मान्यता दिली होती. त्यानंतर हा करार केला जाणार आहे.