भारताचा शेजाऱ्यांना मदतीचा हात, चीनला देणार मात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2023 10:03 IST2023-02-12T06:58:47+5:302023-02-12T10:03:58+5:30
भारतविरोधी वातावरण निर्माण करण्यासाठी बीजिंग नेपाळपासून म्यानमारपर्यंत व बांगलादेशपासून श्रीलंकेपर्यंत पायाभूत सुविधा प्रकल्पांत सशर्त गुंतवणूक करून तेथील सरकारांना आर्थिक जाळ्यात अडकवत आला आहे.

भारताचा शेजाऱ्यांना मदतीचा हात, चीनला देणार मात
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : आपल्या शेजाऱ्यांना फितवण्याचे चीनचे प्रयत्न उधळून लावण्यासाठी भारताने नेपाळमधील पायाभूत सुविधा प्रकल्पांत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याचे धोरण स्वीकारले आहे. ही व्यूहरचना चीनला चोख प्रत्युत्तर असल्याचे मानले जाते.
भारतविरोधी वातावरण निर्माण करण्यासाठी बीजिंग नेपाळपासून म्यानमारपर्यंत व बांगलादेशपासून श्रीलंकेपर्यंत पायाभूत सुविधा प्रकल्पांत सशर्त गुंतवणूक करून तेथील सरकारांना आर्थिक जाळ्यात अडकवत आला आहे. या चालीवर मात करण्यासाठी भारताने नवे धोरण स्वीकारले आहे. नेपाळमध्ये एकात्मिक चेक पोस्टच्या (आयसीपी) आधुनिकीकरणासह नवीन चौक्या बांधणे, पूर्वेकडून पश्चिमेकडे व सीमेपर्यंत रस्त्यांचे जाळे टाकणे, पूल बांधणे, नवीन रेल्वे जाळे इत्यादींसाठी भारताने सर्वसमावेशक आराखडा तयार केला आहे.
पाच रेल्वेमार्गांवर भारताचे काम सुरू
nव्यूहात्मक दृष्टीने महत्त्वाचे पाच रेल्वे मार्ग विकसित करण्याचे काम सुरू आहे. यात विविध धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या रेल्वेमार्गांचाही समावेश आहे.
nनेपाळमध्ये रस्ते बांधणीचे काम खूप आव्हानात्मक आहे. चीन रस्ते प्रकल्पांच्या बहाण्याने नेपाळमधील जनमत प्रभावित करू पाहत आहे.