ऐकावं ते नवलच! 'या' देशात शरीराच्या वजनाइतकं मिळत कर्ज, लठ्ठपणा ठरतं श्रीमंतीच लक्षण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2025 09:32 IST2025-05-25T09:30:54+5:302025-05-25T09:32:14+5:30
लठ्ठपणा ही एक वाढती आरोग्यसमस्या ठरत असताना, आफ्रिकेतील काही देशांमध्ये मोठे शरीर आणि सुटलेले पोट हे अजूनही श्रीमंतीचे लक्षण मानले जाते.

ऐकावं ते नवलच! 'या' देशात शरीराच्या वजनाइतकं मिळत कर्ज, लठ्ठपणा ठरतं श्रीमंतीच लक्षण
जगभरात लठ्ठपणा ही एक वाढती आरोग्यसमस्या ठरत असताना, आफ्रिकेतील काही देशांमध्ये मोठे शरीर आणि सुटलेले पोट हे अजूनही श्रीमंतीचे लक्षण मानले जाते. या पार्श्वभूमीवर, लोक मुद्दाम वजन वाढवत आहेत, पण त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात येत असल्याचे चिंताजनक वास्तव उघड झाले आहे. केनियामध्ये, स्थूल लोकांना अनेकदा बॉस किंवा मुकुब्वा म्हणतात. स्वाहिली भाषेत याचा अर्थ मोठा माणूस असा होतो. याच दरम्यान, एक देश मात्र लोकांना त्यांच्या वजनाकडे बघून कर्ज देत आहे.
या देशात लठ्ठ लोकांना सहज कर्ज मिळते
युगांडाची परिस्थिती अशी आहे की, एखादी व्यक्ती जितकी जास्त लठ्ठ असेल, तितकेच त्याला कर्ज सहज मिळते. कर्ज अर्जात वजन देखील लिहिलेले असते. या देशात असे मानले जाते की, एखाद्या व्यक्तीचे वजन जितके जास्त असेल, तितकेच तो कर्ज फेडू शकेल. तर केनियातील लोकांचा असा विश्वास आहे की, पैसे मिळताच त्यांचे वजन झटपट वाढू लागते. वजन वाढले नाहीतर, लोकांना ती व्यक्ती श्रीमंत आहे हे कळत नाही, असा या लोकांचा समज आहे. मात्र, या सगळ्यात ते या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत की, ते अशा आजारांना आमंत्रण देत आहेत, जे त्यांना मृत्यूकडे ढकलू शकतात.
लठ्ठपणावर जनजागृती सुरू
वर्ल्ड ओबेसिटी अॅटलसनुसार, केनियातील एक तृतीयांश लोक अजूनही दररोज दोन वेळचे अन्न खाऊ शकत नाहीत. तर, या देशात केवळ १३ टक्के लोक लठ्ठ आहेत. एकीकडे लोक पोट भरण्यासाठी धडपडत आहेत, तर दुसरीकडे लोक आपली श्रीमंती दाखवण्यासाठी आपले वजन वाढवत आहेत.
मात्र, आता अनेक आफ्रिकन देशांमध्ये लठ्ठपणावर चर्चा सुरू झाली आहे. तरुण राजकारणी आता लठ्ठपणाचा मुद्दा उपस्थित करत लोकांना याचे दुष्परिणाम सांगत आहेत. केनियामधील परिस्थिती अशी आहे की, बहुतेक लोक या कारणामुळे आजारी पडतात आणि मरतात. आरोग्य मंत्रालयाच्या अहवालानुसार, दरवर्षी ३९ टक्के मृत्यू लठ्ठपणामुळे होतात.