Imran Khan deals with Narendra Modi to remove Article 370; Imran's ex-wife | कलम ३७० हटविण्यासाठी इम्रान खान यांनी केली नरेंद्र मोदींशी डील; इम्रान यांच्या पत्नीने केला दावा
कलम ३७० हटविण्यासाठी इम्रान खान यांनी केली नरेंद्र मोदींशी डील; इम्रान यांच्या पत्नीने केला दावा

इस्लामाबाद - जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटविण्यावरुन पाकिस्तानमध्ये हडकंप उडाला आहे. बिथरलेल्या पाकिस्तानकडून काश्मीर मुद्द्यावर पाकच्या संसदेपासून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीपर्यंत हा मुद्दा उचलून धरला आहे. मात्र जागतिक पातळीवर चीन सोडला तर इतर कोणत्याही देशाने पाकिस्तानला पाठिंबा दिला नाही. त्यामुळे पाकिस्तानचं दुखणं वाढलं आहे. यातच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची आधीची पत्नी रेहम खान हिने या प्रकरणात मोठा खुलासा केला आहे. जम्मू काश्मीर मुद्द्यावरुन रेहम खानने इम्रान खान यांना जबाबदार धरलं आहे. 

इम्रान खान यांची पत्नी रेहम खान ही पत्रकार आहे. त्यामुळे तिच्या विधानाकडे गंभीरतेने पाहिलं जात आहे. रेहम खान यांनी सांगितले आहे की, इम्रान खान यांनी काश्मीर मुद्द्यावर भारतासोबत एक गोपनीय डील केली आहे. नरेंद्र मोदींना खुश करण्यासाठी इम्रान खान यांनी डील केल्याचा दावा रेहम खानने केला आहे. त्यामुळे जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटविण्याच्या विरोधात मजबूत भूमिका पाकिस्तानने घेतली नाही किंवा या निर्णयाविरोधात ठोस निर्णयही घेतला नाही. 

याआधीच पाक पंतप्रधान इम्रान खान यांना पाकिस्तानच्या संसदेत विरोधी पक्षाने घेरले आहे. संसदेत त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली जाते. मात्र आता त्यांच्या पत्नीने केलेल्या या सनसनाटी आरोपावरुन पाकिस्तानच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. रेहम खान हिच्या आरोपावरुन विरोधी पक्ष इम्रान खानला कोंडीत पकडण्याची संधी सोडणार नाही. 

रेहम खान हिने तिच्या मुलाखतीत म्हटलं आहे की, ५ ऑगस्ट रोजी भारताने जम्मू काश्मीरातून कलम ३७० हटविण्याची घोषणा केली. त्यावेळी माझ्या टीममधील एका सहकाऱ्याने मला फोन करुन सांगितलं की, तुम्ही सांगितलेलं खरं ठरलं. मागील ऑगस्ट २०१८ मध्ये मी भारत असं करणार असल्याबाबत मी माझ्या सहकाऱ्याला सांगितले होते असा दावा रेहम खानने केला आहे. 

कोण आहे रेहम खान?
रेहम खान ही पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांची दुसरी पत्नी आहे. रेहम खानला तीन मुलं आहेत. रेहम खान हिचे इम्रान खानसोबत दुसरं लग्न आहे. त्यांचे पहिलं लग्न एजाजुर रेहमान यांच्याशी १९९२ साली झालं होतं. ६ जानेवारी २०१५ रोजी इम्रान खानसोबत त्यांचा विवाह झाला. रेहम खान ब्रिटिश पत्रकार आहे. त्याचसोबत एक लेखक आणि फिल्म निर्मातादेखील आहे. इम्रान खानसोबत त्यांचा विवाह १० महिने राहिला त्यानंतर त्यांनी घटस्फोट केला. 
 

Web Title: Imran Khan deals with Narendra Modi to remove Article 370; Imran's ex-wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.