इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 13:10 IST2025-12-20T13:09:43+5:302025-12-20T13:10:33+5:30
हे प्रकरण एक महागडा बुलगारी ज्वेलरी सेट अत्यंत कमी किंमतीत खरेदी केल्याशी संबंधित असून या प्रकरणामुळे पाकिस्तानच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
रावलपिंडी: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि 'पीटीआय'चे संस्थापक इमरान खान यांची अडचण आणखी वाढली आहे. बहुचर्चित 'तोशाखाना-२' प्रकरणात रावलपिंडीच्या विशेष न्यायालयाने शनिवारी इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी या दोघांनाही प्रत्येकी १७-१७ वर्षांच्या तुरुंगवासाची कठोर शिक्षा ठोठावली आहे. हे प्रकरण एक महागडा बुलगारी ज्वेलरी सेट अत्यंत कमी किंमतीत खरेदी केल्याशी संबंधित असून या प्रकरणामुळे पाकिस्तानच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
रावलपिंडी न्यायालयानं अडियाला कारागृहात सुनावला निकाल -
हा निकाल रावळपिंडी अडियाला कारागृहात आयोजित सुनावणी दरम्यान विशेष न्यायाधीश शाहरुख अरजुमंद यांनी सुनावला. न्यायालयाने इम्रान खान यांना दोन वेगवेगळ्या कलमांखाली शिक्षा सुनावली आहे. यामध्ये 'आपराधिक विश्वासघात' (कलम ४०९) अंतर्गत १० वर्षे कठोर कारावास आणि 'भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्या'च्या कलम ५(२)४७ अंतर्गत ७ वर्षांचा कारावास, अशा एकूण १७ वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
बुशरा बिबीलाही १७ वर्षांचा तुरुंगवास आणि दंडही -
महत्वाचे म्हणजे, या प्रकरणात न्यायालयाने इम्रान खानची पत्नी बुशरा बीबी यांनाही तेवढेच दोषी ठरवले असून, त्यांनाही १७ वर्षांचाच तुरुंगवास सुनावला आहे. तुरुंगवासाशिवाय, न्यायालयाने या दाम्पत्यावर १.६४ कोटी पाकिस्तानी रुपयांचा (१६.४ दशलक्ष) दंडही ठोठावला आहे. जर ही दंडाची रक्कम जमा केली नाही, तर त्यांना अधिक काळ तुरुंगात राहावे लागणार आहे.
न्यायालयाची नरमाईची भूमिका -
शिक्षा सुनावताना इम्रान खान यांचे वाढते वय आणि बुशरा बीबी यांचे महिला असणे, या दोन गोष्टी लक्षात घेत शिक्षेसंदर्भात काहीशी नरमाईची भूमिका घेण्यात आली. अन्यथा, या गुन्ह्याचे स्वरूप पाहता शिक्षा अधिक कठोर असू शकली असती, असे न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले आहे.
काय आहे तोशाखाना-२ प्रकरण? -
हे प्रकरण सरकारी भेटवस्तूंच्या अफरातफरीशी संबंधित आहे. इम्रान खान पंतप्रधान असताना त्यांना मिळालेला अत्यंत महागडा 'बुलगारी ज्वेलरी सेट' त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने नियमांचे उल्लंघन करून, अत्यंत कमी किमतीत खरेदी केला, असा आरोप 'एफआयए'ने (FIA) केला होता. यामुळे सरकारी तिजोरीचे मोठे नुकसान झाल्याचे न्यायालयाने मान्य केले आहे.
इम्रान खान यांची कायदेशीर टीम आता या निकालाला हायकोर्टात आव्हान देण्याच्या तयारीत आहे. हा निकाल तथ्यहीन असल्याचे त्यांच्या वकिलांचे म्हणणे आहे.