Israel US Iran War : अमेरिका विरुद्ध इराण संघर्षाचा जगावर परिणाम; कोणता देश कोणाच्या बाजूने?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 14:46 IST2026-03-02T14:44:45+5:302026-03-02T14:46:17+5:30

Israel US Iran War : इस्रायल आणि अमेरिकेने शनिवारी इराणवर हल्ले केले.  या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई  यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते आणि अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला.

Impact of the US vs Iran conflict on the world; Which country is on whose side? | Israel US Iran War : अमेरिका विरुद्ध इराण संघर्षाचा जगावर परिणाम; कोणता देश कोणाच्या बाजूने?

Israel US Iran War : अमेरिका विरुद्ध इराण संघर्षाचा जगावर परिणाम; कोणता देश कोणाच्या बाजूने?

Israel US Iran War :  अमेरिका इस्त्रायल या दोन्ही देशांनी इराणवर हल्ला केला. या हल्ल्यात इराणचे प्रमुख नेते खामनेई यांचा मृत्यू झाला, या घटनेनंतर इराणने अमेरिकेचे लष्करी तळ असणाऱ्या देशात हल्ले सुरू केले. यामुळे आता पुन्हा तणाव वाढला आहे. अनेक देशांनी अमेरिका आणि इस्रायलला पाठिंबा दिला आहे, तर काहींनी इराणशी एकता व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे अनेक देशांनी सावधगिरीने पावले टाकत आहेत. ते देश तटस्थ विधाने देत आहेत.

इस्रायल आणि अमेरिकेने शनिवारी इराणवर हल्ले केले.  या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई  यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते आणि अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला.

Israel US Iran War : इराणचा सौदी अरेबियावर मोठा हल्ला, जगातील सर्वात मोठी तेल रिफायनरी 'अरामको'ला बनवलं निशाणा

यानंतर इराणने आखाती देशांमध्ये अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. दरम्यान, आता या संपूर्ण घटनेवर जगभरातील देशांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

रविवारी रात्री उशिरा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी फोनवरून चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी सध्याच्या परिस्थितीवर चर्चा केली. "मी माझे भाऊ युएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्याशी बोललो. मी युएईवरील हल्ल्यांचा तीव्र निषेध केला आणि या हल्ल्यांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांना माझ्या संवेदना व्यक्त केल्या. या कठीण काळात भारत युएईसोबत उभा आहे. युएईमध्ये राहणाऱ्या भारतीय समुदायाची काळजी घेतल्याबद्दल मी त्यांचे आभार मानले. तणाव कमी करण्यासाठी आणि प्रादेशिक शांतता, सुरक्षा आणि स्थिरतेला आम्ही पाठिंबा देतो, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले की, अलिकडच्या घडामोडींबद्दल भारताची चिंता व्यक्त करत नागरिकांची सुरक्षा ही सर्वोच्च प्राथमिकता असली पाहिजे.

पंतप्रधान मोदींनी शक्य तितक्या लवकर संघर्ष थांबवण्याची गरज पुन्हा व्यक्त केली. तत्पूर्वी, पंतप्रधानांनी रविवारी रात्री संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्याशी चर्चा केली. पंतप्रधान मोदींनी UAE वरील हल्ल्यांचा निषेध केला आणि UAE मध्ये राहणाऱ्या भारतीय समुदायाची काळजी घेतल्याबद्दल शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांचे आभार मानले.

दरम्यान, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी, २८ फेब्रुवारी रोजी एक निवेदन जारी करून आखाती प्रदेशातील परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, "इराण आणि आखाती प्रदेशातील अलिकडच्या घडामोडींबद्दल भारताला खूप चिंता आहे. आम्ही सर्व पक्षांना संयम बाळगण्याचे, तणाव वाढवणे टाळण्याचे आणि नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे आवाहन करतो."तणाव कमी करण्यासाठी आणि संबंधित समस्या सोडवण्यासाठी संवाद आणि राजनैतिक प्रयत्न केले पाहिजेत. सर्व देशांच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर केला पाहिजे.

दरम्यान, इराणी क्षेपणास्त्र स्थळांवर "बचावात्मक" हल्ल्यासाठी ब्रिटिश लष्करी तळांचा वापर करण्याच्या अमेरिकेच्या विनंतीला ब्रिटनने सहमती दर्शवली आहे.

ही माहिती ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टारमर यांनी दिली. त्यांनी असेही म्हटले आहे की, ब्रिटनने "इराकच्या चुकांमधून" शिकले आहे आणि इराणवरील सुरुवातीच्या हल्ल्यात त्यांचा सहभाग नव्हता आणि "पुढील कोणत्याही हल्ल्यात सहभागी होणार नाही. स्टारमर यांनी सांगितले की अमेरिकेची विनंती स्वीकारण्याचा निर्णय मित्र राष्ट्रांच्या "सामूहिक स्वसंरक्षणासाठी" आणि ब्रिटिशांचे जीव वाचवण्यासाठी घेण्यात आला आहे.

ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनी यांनी संयुक्त निवेदन जारी करून मध्य पूर्वेतील देशांवर इराणच्या सततच्या हल्ल्यांवर टीका केली.

ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि जर्मन चांसलर फ्रेडरिक मेर्ट्झ यांनी सांगितले की ते मध्य पूर्वेतील त्यांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यास तयार आहेत.

युरोपियन देश कोणासोबत?

अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर आणि तेहरानच्या प्रत्युत्तरात्मक हल्ल्यांनंतर, युरोपियन नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन यांनी आठवण करून दिली की युरोपियन युनियनने इराणच्या "खूनी राजवटी" विरुद्ध व्यापक निर्बंध लादले आहेत.

त्या म्हणाल्या, "आम्ही सर्व पक्षांना जास्तीत जास्त संयम बाळगण्याचे, नागरिकांचे संरक्षण करण्याचे आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे पूर्णपणे पालन करण्याचे आवाहन करतो."

 इटलीचे पंतप्रधान जॉर्जिओ मेलोनी यांच्या कार्यालयाने इराणी जनतेशी एकता व्यक्त केली. त्यांच्या निवेदनात असे म्हटले आहे की, नागरी आणि राजकीय हक्कांचा आदर करण्याची मागणी सुरूच राहील. मेलोनी तणाव कमी करण्यासाठी मित्र राष्ट्रे आणि प्रादेशिक नेत्यांशी संवाद साधतील, असेही यामध्ये म्हटले आहे.

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज म्हणाले की, त्यांचा देश "दडपशाहीविरुद्ध लढणाऱ्या इराणच्या शूर लोकांसोबत उभा आहे" आणि इराणला अण्वस्त्रे मिळविण्यापासून रोखण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्नांना पाठिंबा देतो.

आखाती देशांचा इराणला इशारा

गल्फ कोऑपरेशन कौन्सिलच्या सदस्य देशांनी रविवारी सदस्य देशांवर इराणी हल्ल्यांमुळे झालेल्या मोठ्या नुकसानीबद्दल चर्चा करण्यासाठी एक बैठक घेतली. GCC ने म्हटले आहे की, नागरी सुविधा आणि निवासी क्षेत्रांना लक्ष्य करण्यात आले. GCC मध्ये संयुक्त अरब अमिराती (UAE), बहरीन, सौदी अरेबिया, ओमान, कतार आणि कुवेत यांचा समावेश आहे.

या सर्व देशांनी इराणी हल्ल्यांचा निषेध केला आणि इराणवर त्यांच्या सार्वभौमत्वाचे आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप केला. एका प्रेस रिलीजमध्ये, GCC ने इराणला त्यांचे हल्ले थांबवण्याचे आवाहन केले आणि संवादाचे महत्त्व अधोरेखित केले. तथापि, गटाने असा इशाराही दिला की ते त्यांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी "सर्व आवश्यक उपाययोजना" करेल.

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी त्यांच्या शेजाऱ्यांना लक्ष्य करण्याचा आरोप नाकारला.

"आम्ही पर्शियन आखाती देशांमध्ये आमच्या शेजाऱ्यांवर हल्ला करत नाही आहोत, आम्ही या देशांमध्ये अमेरिकेच्या उपस्थितीला लक्ष्य करत आहोत. शेजाऱ्यांनी त्यांच्या तक्रारी या युद्धाचा निर्णय घेणाऱ्यांना कळवाव्यात," असे त्यांनी अल जझीराला सांगितले.

खामेनेई यांच्या निधनावर पाकिस्तानने व्यक्त केला शोक

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी म्हटले की, या दुःखाच्या वेळी पाकिस्तानचे सरकार आणि जनता इराणच्या जनतेसोबत आहे.

पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ट्विटरवर लिहिले की, "या दुःखाच्या वेळी पाकिस्तानचे सरकार आणि जनता इराणी जनतेसोबत आहे. अयातुल्ला सय्यद अली खामेनई यांच्या शहीदत्वाबद्दल आम्ही शोक व्यक्त करतो." पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कायद्याच्या उल्लंघनाबद्दल चिंता व्यक्त करतो. कोणत्याही देशाच्या प्रमुखाला लक्ष्य केले जाऊ नये ही एक जुनी परंपरा आहे."

चीननेही इराणला पाठिंबा दर्शवला

इराणवरील अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांबद्दल आणि सर्वोच्च नेते अयातुल्ला खमेनेई यांच्या हत्येबद्दल चीनने एक निवेदन जारी केले आहे. चीनने ते "संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरच्या उद्देश आणि तत्त्वांच्या विरुद्ध" असल्याचे म्हटले आहे.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, "इराणच्या सर्वोच्च नेत्यावरील हल्ला आणि त्यांची हत्या ही इराणच्या सार्वभौमत्वाचे आणि सुरक्षेचे गंभीर उल्लंघन आहे. ही कृती संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरच्या उद्देश आणि तत्त्वांच्या आणि आंतरराष्ट्रीय संबंधांच्या मूलभूत नियमांच्या विरोधात आहे. चीन याचा तीव्र विरोध करतो आणि निषेध करतो.

चीनने शांततेचे आवाहन केले

चीनने म्हटले आहे की, "आम्ही लष्करी कारवाई तात्काळ थांबवण्याची आणि तणावपूर्ण परिस्थिती आणखी वाढू नये यासाठी आवाहन करतो. आम्ही मध्य पूर्व आणि संपूर्ण जगात शांतता आणि स्थैर्य राखण्याचे आवाहन करतो."

रशियानेही अमेरिकेच्या हल्ल्यांवर टीका केली

रशियाची सरकारी वृत्तसंस्था, TASS नुसार, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खमेनी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

पुतिन यांनी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांना सांगितले की, "अली खामेनेई आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू हा मानवी नैतिकता आणि आंतरराष्ट्रीय कायद्याविरुद्धचा खून आहे.

रशियन परराष्ट्र मंत्रालयाने त्यांच्या टेलिग्राम चॅनेलवरील एका निवेदनात म्हटले आहे की, "आम्ही तातडीने राजकीय आणि राजनैतिक तोडग्याच्या मार्गावर परतण्याची मागणी करतो.

Web Title : अमेरिका बनाम ईरान संघर्ष: वैश्विक प्रभाव और देशों के गठबंधन

Web Summary : ईरान पर हमलों के बाद, वैश्विक तनाव बढ़ गया है। राष्ट्र प्रतिक्रिया करते हैं, कुछ अमेरिका और इज़राइल का समर्थन करते हैं, अन्य ईरान का। भारत संघर्ष के बीच नागरिकों की सुरक्षा को प्राथमिकता देते हुए तनाव कम करने का आग्रह करता है।

Web Title : US vs Iran Conflict: Global Impact and Country Alliances

Web Summary : Following attacks on Iran, global tensions rise. Nations react, some backing the US and Israel, others Iran. India urges de-escalation, prioritizing citizen safety amidst the conflict.