"या ४ देशांशी संबंध ठेवाल तर...!"; व्हेनेझुएलाला अमेरिकेचं आणखी एक 'फरमान', एक तर भारताचा 'जिगरी' मित्र!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 12:16 IST2026-01-07T12:15:43+5:302026-01-07T12:16:30+5:30
us tells venezuela to cut ties with these 4 countries including 1 friend of india

"या ४ देशांशी संबंध ठेवाल तर...!"; व्हेनेझुएलाला अमेरिकेचं आणखी एक 'फरमान', एक तर भारताचा 'जिगरी' मित्र!
निकोलस मादुरो यांच्या अटकेनंतर अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यातील तणाव प्रचंड वाढला आहे. यातच आता अमेरिकेने व्हेनेझुएलासाठी नवे फर्मान काढले आहे. अमेरिकेने व्हेनेझुएलाला चार देशांसोबतचे संबंध कमी करण्यास किंबहुना तोडण्यासच सांगितले आहे. महत्वाचे म्हणजे, यात भारताचा 'जिगरी मित्र' असलेल्या रशियाचाही समावेश आहे.
व्हेनेझुएलाने तेल उत्पादनात केवळ अमेरिकेसोबत विशेष भागीदारी करावी आणि कच्च्या तेलाच्या विक्रीसंदर्भात अमेरिकेला प्राधान्य द्यावे. एवढेच नाही तर, एबीसी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, व्हेनेझुएलाने चीन, रशिया, इराण आणि क्युबा यांच्याशी असलेले आर्थिक संबंध पूर्णपणे तोडून त्यांना बाहेर काढावे, असेही अमेरिकेने म्हटले आहे.
...तरच व्हेनेझुएलाला अधिक तेल उत्पादनाची परवानगी मिळेल -
याशिवाय, या अटी मान्य केल्यावरच व्हेनेझुएलाला अधिक तेल उत्पादनाची परवानगी मिळेल, असे संबधित वृत्तात तीन अज्ञात सूत्रांच्या हवाल्याने म्हणण्यात आले आहे. निकोलस मादुरो यांना अमेरिकन विशेष दलाने अटक करून न्यूयॉर्कला नेल्यानंतर आणि डेल्सी रोड्रिगेज यांना अंतरिम राष्ट्राध्यक्ष घोषित केल्यानंतर या घडामोडी घडल्या आहेत.
महत्वाचे म्हणजे, ह्यूगो शावेज आणि मादुरो यांच्या कार्यकाळापासूनच व्हेनेझुएला आर्थिकदृष्ट्या आणि सुरक्षा सहकार्यासाठी चीन, रशिया, इराण आणि क्युबावर अवलंबून राहिला आहे. यामुळे हे संबंध तोडणे हा व्हेनेझुएलाच्या परराष्ट्र धोरणातील मोठा निर्णय असेल.
व्हेनेझुएला अमेरिकेला ३० ते ५० दशलक्ष बॅरल तेल देईल -
दरम्यान, ट्रम्प यांनी जाहीर केले आहे की, व्हेनेझुएला अमेरिकेला ३० ते ५० दशलक्ष बॅरल तेल देईल, ज्यातून मिळणारे उत्पन्न दोन्ही देशांच्या फायद्यासाठी वापरले जाईल. तसेच, अमेरिकन तेल कंपन्यांच्या व्हेनेझुएलातील गुंतवणुकीसंदर्भातही लवकरच चर्चा होईल. तसेच, देशाच्या भविष्यासंदर्भात विशेषत्वाने तेल महसुलाच्या नियोजनात अमेरिका महत्त्वाची भूमिका बजावेल, असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.