'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 08:37 IST2025-12-18T08:36:36+5:302025-12-18T08:37:24+5:30
Vladimir Putin on European Leaders: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन युरोपीय नेत्यांवर भडकले. डुकाराच्या औलादी असा उल्लेख करत पुतीन यांनी अख्खा युक्रेन बळकावू अशी धमकीच दिली.

'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
डुकराची पिले अशा शब्दात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युरोपीय नेत्यांची खिल्ली उडवली. जर कीव अर्थात युक्रेन आणि त्याचे पश्चिमेकडील समर्थकांनी अमेरिकेचा पाठिंबा असलेल्या शांतता प्रस्तावावर चर्चा केली नाही. तर मॉस्को ताकदीचा वापर करून युक्रेनचा आणखी भाग ताब्यात घेईल. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाची वार्षिक बैठक झाली. या बैठकीत ते बोलत होते.
संरक्षण मंत्रालयाच्या बैठकीत बोलताना व्लादिमीर पुतीन यांनी युरोपीय नेत्यांचा उल्लेख डुकरांच्या औलादी असा केला. पश्चिमेकडील देश जाणीवपूर्वक रशियाविरोधात भीतीचे वातावरण तयार करत आहेत, असेही ते म्हणाले.
नाटो देश खोट्या अफवा पसरवताहेत
बैठकीत बोलताना पुतीन म्हणाले, "हे सगळं खोटं आहे. निराधार आहे. रशिया नाटो देशांवर हल्ले करत असल्याच्या अफवा पसरवत आहेत. युरोपीय देशांवर हल्ला करण्याचा रशियाचा कोणताही विचार नाही. पण, जाणूनबुजून हे सगळे केले जात आहे."
पुतीन म्हणाले की, 'जर चर्चेतून ठोस तोडगा निघाला नाही. समाधानकारक मार्ग निघाला नाही. तर लष्करी कारवाई हा एकच रस्ता असेल. रशियाचे सैन्य सर्व आघाड्यांवर आगेकूच करत आहे आणि रशिया मुत्सद्देगिरी किंवा सैन्याच्या माध्यमातून आपली ऐतिहासिक भूमी मुक्त करेल. कारण युद्ध संपवण्यासाठी अमेरिकेच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले प्रयत्न सध्या थांबलेले आहेत. पश्मिमेकडील देशांचा दबाव झगारून देत रशिया पुढेच जात राहील.'
युक्रेनच्या १९ टक्के भूभागावर रशियाचा ताबा
रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, आतापर्यंत रशियाने युक्रेनचा १९ टक्के भूभाग बळाकावला आहे. यात २०१४ मधील क्रिमियासह डोनबासचा जास्त भाग आहे. खेरसान आणि प्रदेशाचाही भूभाग रशियाने बळकावला आहे.