"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 11:17 IST2025-08-14T11:16:53+5:302025-08-14T11:17:48+5:30
अमेरिकेतील अलास्का येथे या दोन्ही नेत्यांमध्ये शुक्रवारी (१५ ऑगस्ट) युक्रेन युद्ध थांबवण्यासंदर्भात बैठक होणार आहे.

"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!
युक्रेनसोबतचे युद्ध थांबवले नाही, तर गभीर परिणाम होतील, अशी धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी दिली आहे. ट्रम्प बुधवारी म्हणाले, जर रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी शुक्रवारच्या बैठकीनंतर, युक्रेन युद्ध थांबवण्यास सहमती दर्शविली नाही, तर त्याचे 'अत्यंत गंभीर परिणाम' होतील. अमेरिकेतील अलास्का येथे या दोन्ही नेत्यांमध्ये शुक्रवारी (१५ ऑगस्ट) युक्रेन युद्ध थांबवण्यासंदर्भात बैठक होणार आहे. दरम्यान, रशिया आणि युक्रेनमधील जमिनीच्या देवाणघेवाणीवरही चर्चा होऊ शकते. मात्र, हे युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी नाकारले आहे.
कोणत्याही परिस्थितीत अमेरिकेची युद्धबंदीची इच्छा -
ट्रम्प यांनी बुधवारी युरोपीय नेत्यांसोबत व्हर्च्युअल बैठक केली. या बैठकीसंदर्भात बोलताना फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन म्हणाले, अलास्का येथे होणाऱ्या अमेरिका-रशिया शिखर परिषदेत, अमेरिकेची युद्धबंदीची इच्छा आहे, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की देखील या बाठकीत सहभागी झाले होते. दरम्यान, झेलेन्स्की यांनी पुतीन यांच्यावर, ट्रम्प यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीपूर्वीच फसवणुकीचा आरोप केला आहे.
झेलेन्स्की म्हणाले, "रशिया संपूर्ण युक्रेनवर कब्जा करण्यास सक्षम आहे हे दाखवण्यासाठी, पुतिन युक्रेनच्या आघाडीच्या सर्वच क्षेत्रांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच, पुतिन निर्बंधांसंदर्भातही खोटे बोलत आहेत. निर्बंधांचा आपल्यावर काहीही फरक पडत नाही, असे भासवण्याचाही ते प्रयत्न करत आहेत. मात्र, प्रत्यक्षात निर्बंध अत्यंत प्रभावी आहेत आणि रशियाच्या युद्ध, अर्थव्यवस्थेवर याचा मोठा परिणाम होत आहे, असेही झेलेन्स्की म्हणाले.