इस्लामाबाद : भारताने छोटीशी जरी आगळीक केली तरी पाकिस्तान अतिशय निर्णायक प्रत्युत्तर देईल, अशी दर्पोक्ती पाकिस्तानचे लष्करप्रमुख फिल्ड मार्शल सय्यद असीम मुनीर यांनी शनिवारी केली. खैबर पख्तुनख्वा प्रांतातील अबोटाबाद येथील पाकिस्तान मिलिटरी अकॅडमी (पीएमए) येथे लष्करी कॅडेटच्या दीक्षांत समारंभात त्यांनी हे वक्तव्य केले.
त्यांनी सांगितले की, आम्ही कोणाच्याही धमक्यांना घाबरत नाही. कोणी आगळीक करण्याचा प्रयत्न केलाच तर त्याला पाकिस्तान मुँहतोड जबाब देऊ. यंदा मे महिन्यात झालेल्या भारत-पाकिस्तान संघर्षात पाकच्या लष्कराने अत्यंत शौर्याने लढून शत्रूवर विजय मिळविला, असा दावाही मुनीर यांनी केला.
पाकिस्तानला अस्थिर करण्यासाठी भारत दहशतवादाचा हत्यार म्हणून वापर करतो, असा दावा फिल्ड मार्शल सय्यद असीम मुनीर यांनी केला. तसेच अफगाणिस्तानच्या भूमीवरून दहशतवादी कारवाया करणाऱ्यांचा बीमोड केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.