'अल्लाहची इच्छा असेल तर...', खामेनींचे ट्रम्प यांना खुले आव्हान; मध्यपूर्वेत मोठ्या युद्धाची नांदी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 23:51 IST2026-02-01T23:49:48+5:302026-02-01T23:51:40+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर आता इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी अत्यंत कडक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.

'अल्लाहची इच्छा असेल तर...', खामेनींचे ट्रम्प यांना खुले आव्हान; मध्यपूर्वेत मोठ्या युद्धाची नांदी?
मध्यपूर्वेत पुन्हा एकदा युद्धाचा धुरळा उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर आता इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी अत्यंत कडक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. "जर अल्लाहने इच्छिले तर, अमेरिकेचा हा छळ आणि त्यांच्या कुरापतींचा अंत लवकरच होईल," अशा शब्दांत खामेनी यांनी ट्रम्प यांना ललकारले आहे. रविवारी दिलेल्या या इशाऱ्यामुळे जागतिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
१२ तासांत दोनदा धमकी: इराणचा बाणा कडक!
गेल्या १२ तासांत खामेनी यांनी अमेरिकेला दुसऱ्यांदा लक्ष्य केले आहे. इराण नम्रतेने वागायला तयार नाही, हे स्पष्ट करताना ते म्हणाले, "इराण खंबीर होता आणि खंबीरच राहील. अमेरिकेने हे लक्षात ठेवावे की, जर त्यांनी युद्धाची ठिणगी टाकली, तर हे युद्ध केवळ इराणपुरते मर्यादित राहणार नाही. याचे रूपांतर भीषण प्रादेशिक युद्धात होईल." आम्ही कुणाला डिवचणारे नाही, पण आम्हाला कुणी त्रास दिला तर त्याला सोडणार नाही, असा सज्जड दमही त्यांनी भरला आहे.
आमची बोटं ट्रिगरवर; लष्करप्रमुख आक्रमक
इराणचे केवळ राजकीय नेतृत्वच नाही, तर लष्करही आता 'वॉर मोड'मध्ये आले आहे. तेहरानमधील एका कार्यक्रमात लष्करप्रमुख आमिर हातामी यांनी शत्रूला इशारा दिला. ते म्हणाले, "इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे सैन्य आज पूर्णपणे सज्ज आहे. शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर आमची करडी नजर आहे. आमची बोटं सध्या ट्रिगरवर आहेत. जर शत्रूने एखादी छोटी चूक जरी केली, तर ते स्वतःच्या आणि इस्रायलच्या विनाशाला निमंत्रण देतील."
ट्रम्प यांची दुहेरी चाल?
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प इराणला धडा शिकवण्याची भाषा करत आहेत, तर दुसरीकडे चर्चेचे दार उघडे असल्याचेही सांगत आहेत. "आम्ही कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार आहोत, पण हा प्रश्न चर्चेतून सुटला तर चांगले होईल," असे ट्रम्प यांनी म्हटले होते. मात्र, इराणने ट्रम्प यांच्या या भूमिकेला दबावतंत्र मानून फेटाळून लावले आहे.
इस्रायलच्या सुरक्षेला धोका?
इराणने थेट अमेरिकेसोबतच इस्रायलचे नाव घेतल्याने आता या संघर्षात इस्रायलचीही एन्ट्री होण्याची चिन्हे आहेत. जर अमेरिकेने इराणवर हल्ला केला, तर इराण मध्यपूर्वेतील अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांना लक्ष्य करण्याची शक्यता आहे. यामुळे संपूर्ण आखाती देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, कच्च्या तेलाच्या किमतीवरही याचा परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.