"तीन मुलांची आई आहे, भांडी घासते"; उपराष्ट्रपतींच्या पत्नी उषा व्हान्स यांचे विरोधकांना 'देसी' उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 17:20 IST2025-11-25T17:20:32+5:302025-11-25T17:20:47+5:30
अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स आणि त्यांच्या पत्नीमध्ये दुरावा आल्याच्या चर्चा असताना उषा व्हान्स यांनी प्रतिक्रिया दिली.

"तीन मुलांची आई आहे, भांडी घासते"; उपराष्ट्रपतींच्या पत्नी उषा व्हान्स यांचे विरोधकांना 'देसी' उत्तर
Usha Vance Wedding Ring: अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांची पत्नी उषा व्हान्स सध्या एका व्हायरल फोटोमुळे जोरदार चर्चेत आल्या आहेत. सार्वजनिक कार्यक्रमात त्यांच्या बोटात वेडिंग रिंग नसलेल्या फोटोवरून सोशल मीडियावर त्यांच्या वैवाहिक जीवनात तणाव असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. मात्र, या अफवांवर उषा व्हान्स यांच्या कार्यालयाकडून एक मजेशीर स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
१९ नोव्हेंबर रोजी उषा व्हान्स यांनी अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांच्यासोबत नॉर्थ कॅरोलिना येथील कॅम्प लेज्यून येथे भेट दिली होती. या दौऱ्यादरम्यान घेतलेल्या त्यांच्या काही क्लोज-अप शॉट्समध्ये त्यांच्या बोटात लग्नाची अंगठी दिसली नाही. अंगठी गायब असल्याचे लक्षात येताच सोशल मीडियावर लगेच जोरदार चर्चा सुरु झाल्या. जेडी व्हान्स आणि उषा व्हान्स यांच्या वैवाहिक जीवनात तणाव असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. हा पती-पत्नीच्या नात्यातील तणावाचा पुरावा आहे,' असे काही जणांनी म्हटले, तर काही जणांनी 'उपराष्ट्रपतींना आता रात्री सोफ्यावर झोपावे लागेल' अशा मिश्किल प्रतिक्रिया दिल्या.
"भांडी घासावी लागतात"
सोशल मीडियावर सुरू असलेल्या या सर्व अफवांवर उषा व्हान्स यांच्या कार्यालयाने अत्यंत मजेदार प्रतिक्रिया दिली आहे. पीपल मॅगझिनशी बोलताना त्यांच्या प्रवक्त्याने सांगितले की, "उषा व्हान्स या तीन मुलांची आई आहेत. त्या दिवसभर भांडी धुतात, मुलांना आंघोळ घालतात आणि अनेकवेळा अंगठी घालायला विसरतात." वैयक्तिक जीवनात येणाऱ्या कामांमुळे कधीकधी महत्त्वाची गोष्ट विसरली जाते, असं स्पष्टीकरण व्हान्स यांच्या कार्यालयाकडून देण्यात आले.
यापूर्वी झालेल्या काही घटनांमुळे व्हान्स जोडपे गेल्या काही महिन्यांपासून लोकांच्या नजरेत आले आहे, ज्यामुळे अंगठी गायब होण्याच्या बातमीला अधिक हवा मिळाली. काही दिवसांपूर्वी जेडी व्हान्स कंझर्व्हेटिव्ह ॲक्टिव्हिस्ट चार्ली किर्क यांची पत्नी एरिका यांना मिठी मारताना दिसले होते. एरिका यांनी एका कार्यक्रमात जेडी व्हान्स यांचा परिचय करून, "माझ्या दिवंगत पतीमधील काही गोष्टी मला उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांच्यात दिसतात," असं म्हटलं होतं. ज्यामुळे दोघांच्या नात्यावर चर्चा झाली होती.
तसेच काही महिन्यांपूर्वी 'टर्निंग पॉइंट यूएसए' नावाच्या कार्यक्रमात जेडी व्हान्स यांनी एक विधान केले होते, ज्यामुळे ही अफवा अधिक वाढली. ते म्हणाले होते की, त्यांची पत्नी हिंदू आहे आणि त्यांची इच्छा आहे की तिने कधीतरी कॅथोलिक धर्म स्वीकारावा. "मी ख्रिश्चन गॉस्पेलवर विश्वास ठेवतो आणि आशा आहे की माझी पत्नी देखील कधीतरी याच दिशेने येईल," असे त्यांनी म्हटले होते.
दरम्यान, जेडी व्हान्स आणि उषा व्हान्स यांची ओळख येल लॉ स्कूलमध्ये शिक्षण घेत असताना झाली होती. त्यांनी २०१४ मध्ये विवाह केला असून, त्यांना इव्हान, विवेक आणि मीराबेल अशी तीन मुले आहेत.