"इतिहास सांगेल गद्दार कोण!" निकोलस मादुरो यांचा मुलगा संतापला, अमेरिकेला दिलं चॅलेंज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 16:32 IST2026-01-05T16:29:33+5:302026-01-05T16:32:24+5:30
Nicolas Maduro Arrest: व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अमेरिकेने अटक केल्यानंतर दक्षिण अमेरिकेत मोठी राजकीय खळबळ उडाली.

"इतिहास सांगेल गद्दार कोण!" निकोलस मादुरो यांचा मुलगा संतापला, अमेरिकेला दिलं चॅलेंज!
व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अमेरिकेने अटक केल्यानंतर दक्षिण अमेरिकेत मोठी राजकीय खळबळ उडाली. या संपूर्ण प्रकरणावर मादुरो यांचे पुत्र निकोलस मादुरो गुएरा यांनी एक अत्यंत भावनिक आणि संतप्त ऑडिओ संदेश जारी केला आहे. "इतिहास सांगेल की गद्दार कोण होता आणि भविष्य या लोकांना उघड करून न्याय देईल," अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या ऑडिओ संदेशात गुएरा म्हणतात, "आम्ही ठीक आहोत आणि शांत आहोत. विरोधकांना आम्हाला कमकुवत पाहायचे आहे, पण आम्ही सन्मान आणि प्रतिष्ठेचे झेंडे फडकवत राहू. या घटनेमुळे आम्हाला नक्कीच दुःख आणि राग आहे, पण ते आम्हाला हरवू शकणार नाहीत. मी माझ्या आईची सेलियाची शपथ घेतो, ते यशस्वी होणार नाहीत."
निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नी सिलिया फ्लोरेस यांना जानेवारी २०२६ मध्ये अमेरिकेने अटक केली असून ते सध्या अमेरिकेच्या ताब्यात आहेत. सोमवारी त्यांना न्यूयॉर्कमधील फेडरल कोर्टात हजर केले जाणार आहे. अमेरिकेने त्यांच्यावर दहशतवाद आणि ड्रग्ज तस्करीचा मोठा कट रचल्याचा गंभीर आरोप लावले आहेत.
३५ वर्षीय निकोलस मादुरो गुएरा, ज्यांना व्हेनेझुएलात द प्रिन्स म्हणून ओळखले जाते, ते देखील अमेरिकेच्या रडारवर आहेत. अमेरिकन फेडरल फिर्यादींनी गुएराला एका मोठ्या ड्रग्ज नेटवर्कचा सूत्रधार म्हटले आहे. आरोपानुसार, गुएरा यांनी व्हेनेझुएलातून अमेरिकेत कोकेनची तस्करी करण्यासाठी सरकारी मालमत्ता, लष्करी बळ आणि राजकीय प्रभावाचा वापर केला.
दरम्यान, आपल्या वडिलांच्या समर्थनार्थ गुएरा यांनी आज आणि उद्या व्हेनेझुएलामध्ये सार्वजनिक निदर्शने करण्याचे आवाहन समर्थकांना केले आहे. नेतृत्वाभोवती एकत्र येऊन आपली एकता दाखवण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे.