बांग्लादेशात परतणार, दहशतवाद्यांचे सरकार संपवणार; शेख हसीना यांचा युनूस सरकारला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 16:18 IST2025-02-18T16:18:10+5:302025-02-18T16:18:52+5:30
बांग्लादेशची सेवा करण्यासाठी अल्लाहने मला जिवंत ठेवले.

बांग्लादेशात परतणार, दहशतवाद्यांचे सरकार संपवणार; शेख हसीना यांचा युनूस सरकारला इशारा
Sheikh Hasina attacks Muhammad Yunus : बांग्लादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांनी सोमवारी(17 फेब्रुवारी) मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारवर जोरदार टीका केली. याशिवाय, मुहम्मद युनूस यांचा 'दहशतवादी' असा उल्लेखही केला. तसेच, लवकरच बांग्लादेशात परतून दहशतवाद्यांचे सरकार उलथून लावण्याची शपथही घेतली.
बांग्लादेशात दहशतवादी खुले
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अवामी लीगचे अध्यक्ष नजरुल इस्लाम यांनी व्हर्च्युअल कॉन्फरन्स आयोजित केली होती, ज्यात बोलताना शेख हसीना यांनी मुहम्मद युनूस सरकारवर जोरदार टीका केली. युनूस यांनी बांग्लादेशला दहशतवादाचा अड्डा बनवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. युनूस यांना सरकार चालवण्याचा अनुभव नाही. त्यांनी सर्व तपास समित्या विसर्जित केल्या आणि दहशतवाद्यांना खुले सोडले, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
मी पुन्हा येईन...
मुहम्मद युनूसने आपल्या अंतरिम सरकारमध्ये एका तथाकथित विद्यार्थी नेत्याचा समावेश केला आहे. तो म्हणतो, पोलिसांना मारल्याशिवाय आंदोलन होऊ शकत नाही. ही अराजकता संपवायची आहे. देशाची पुन्हा सेवा करण्यासाठीच अल्लाहने मला हिंसाचारातून वाचवले. मी लवकरच परत येईन आणि हे दहशतवाद्यांचे सरकार पाडेन, इंशाअल्लाह. तोपर्यंत सर्व बांग्लादेशी नागरिकांनी शांत आणि एकजूट राहावे. मी परत आल्यावर शहीदांचा बदला घेईन आणि पूर्वीप्रमाणेच न्याय्य सरकार चालवेन, असेही त्या यावेळी म्हणाल्या.