"माझ्यामुळेच NATO अस्तित्वात, आता ग्रीनलँडवरही आमचाच ताबा हवा" Donald Trump यांचा मोठा दावा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 13:04 IST2026-01-12T13:02:58+5:302026-01-12T13:04:01+5:30
Donald Trump On NATO: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नाटो आणि ग्रीनलँडबाबत केलेल्या एका विधानाने संपूर्ण जगात खळबळ उडली आहे.

"माझ्यामुळेच NATO अस्तित्वात, आता ग्रीनलँडवरही आमचाच ताबा हवा" Donald Trump यांचा मोठा दावा!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नाटो आणि ग्रीनलँडबाबत केलेल्या एका खळबळजनक विधानामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले. "माझ्यामुळेच आज नाटो अस्तित्वात आहे आणि मीच या संघटनेला वाचवले आहे," असा दावा ट्रम्प यांनी केले. तसेच, ग्रीनलँडवर अमेरिकेचे नियंत्रण मिळवण्याबाबत त्यांनी पुन्हा एकदा आपली आक्रमक भूमिका स्पष्ट केली.
डोनाल्ड ट्रम्प यांनी नाटो सदस्य देशांच्या संरक्षण खर्चावरून जोरदार फटकेबाजी केली. ते म्हणाले की, जर मी अध्यक्ष नसतो, तर नाटो ही संघटना केव्हाच कोसळली असती. ट्रम्प यांच्या दाव्यानुसार, त्यांच्या दबावामुळेच सदस्य देशांनी आपल्या संरक्षण खर्चात मोठी वाढ केली."मी केवळ नाटोला वाचवले नाही, तर सदस्य देशांना त्यांच्या जीडीपीच्या ५.५ टक्के वाटा संरक्षण क्षेत्रासाठी देण्यास राजी केले. यापूर्वी हा खर्च केवळ २ टक्के होता. आज माझ्यामुळेच ते ५ टक्के योगदान देत आहेत", असे ट्रम्प यांनी म्हटले.
नाटोच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना ते पुढे म्हणाले की, "आम्ही नाटोवर प्रचंड पैसा खर्च करतो. पण जर भविष्यात अमेरिकेला नाटोची गरज पडली, तर ते देश आमच्यासाठी उभे राहतील का? याबाबत मला शंका आहे. ग्रीनलँड या बेटावर अमेरिकेचे नियंत्रण असावे, ही आपली जुनी इच्छा ट्रम्प यांनी पुन्हा बोलून दाखवली. यावेळी त्यांनी रशिया आणि चीनच्या वाढत्या प्रभावाचा दाखला दिला. ट्रम्प यांच्या मते, जर अमेरिकेने ग्रीनलँड ताब्यात घेतले नाही, तर रशिया किंवा चीन यावर आपला ताबा मिळवतील. पण मी रशिया किंवा चीनला तिथे पाय रोवू देणार नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.