Donald Trump Diet: "ट्रम्प यांच्या खाण्याच्या सवयी जणू विषच!" आरोग्य सचिवांचा धक्कादायक खुलासा, काय खातात?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 13:29 IST2026-01-14T13:28:18+5:302026-01-14T13:29:41+5:30
Robert Kennedy On Donald Trump Diet: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ऊर्जेचं रहस्य काय? असा प्रश्न सर्वांनाच पडतो. पण त्यांचे सहकारी रबर्ट एफ. केनेडी ज्युनियर यांनी ट्रम्प यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींबाबत काही धक्कादायक गोष्टी सांगितल्या आहेत.

Donald Trump Diet: "ट्रम्प यांच्या खाण्याच्या सवयी जणू विषच!" आरोग्य सचिवांचा धक्कादायक खुलासा, काय खातात?
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या जीवनशैलीबद्दल आणि विशेषतः त्यांच्या खाण्याच्या सवयींबद्दल नेहमीच चर्चा होत असते. आता अमेरिकेचे आरोग्य सचिव रबर्ट एफ. केनेडी ज्युनियर यांनी ट्रम्प यांच्या आहाराबाबत काही धक्कादायक खुलासे केले आहेत. ट्रम्प यांचे खाणे अत्यंत वाईट असून ते दिवसभर शरीरात जणू विष टाकत असतात, असे केनेडी यांनी एका पॉडकास्टमध्ये म्हटले आहे.
केनेडी यांच्या म्हणण्यानुसार, ट्रम्प यांच्या आहारात प्रामुख्याने मॅकडोनाल्डसारखे फास्ट फूड, कँडी आणि डाएट कोक यांचा समावेश असतो. "ते नेहमीच डाएट कोक पितात. जर तुम्ही त्यांच्यासोबत प्रवास केला, तर तुम्हाला असे वाटेल की, ते दिवसभर स्वतःच्या शरीरात विष टाकत आहेत," असे केनेडी यांनी नमूद केले. इतका अनहेल्दी आहार घेऊनही ट्रम्प इतके सक्रिय कसे आहेत? याचे आश्चर्य केनेडी यांनी व्यक्त केले.
प्रवासादरम्यान ट्रम्प मुद्दामहून जंक फूड खाणे पसंत करतात. यामागील त्यांचे तर्क रंजक आहे. ते मोठ्या नामांकित कंपन्यांच्या अन्नावर जास्त विश्वास ठेवतात. प्रवासात बाहेरचे अन्न खाऊन आजारी पडण्याची त्यांना भीती वाटते, म्हणून ते ब्रँडेड फास्ट फूडला प्राधान्य देतात. केनेडी यांनी पुढे असेही म्हटले की, ट्रम्प हे त्यांनी पाहिलेल्या सर्वात उत्साही व्यक्तींपैकी एक आहेत. खाण्याच्या सवयी विचित्र असल्या तरी ट्रम्प यांचे आरोग्य मात्र उत्तम असल्याचे समोर आले आहे. डॉ. मेहमेट ओझ यांनी ट्रम्प यांच्या वैद्यकीय नोंदी तपासल्या असून ते निरोगी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
येत्या जूनमध्ये डोनाल्ड ट्रम्प ८० वर्षांचे होतील. अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेणारे ते सर्वात वयस्कर व्यक्ती आहेत. अलीकडेच त्यांच्या उजव्या हातावर काही निळे डाग दिसले होते, ज्यावर स्पष्टीकरण देताना व्हाईट हाऊसने सांगितले की, हृदयाच्या आरोग्यासाठी नियमितपणे एस्पिरिन घेतल्यामुळे हे डाग पडले असून काळजीचे कोणतेही कारण नाही. एकीकडे अयोग्य आहार आणि दुसरीकडे आश्चर्यकारक ऊर्जा, अशा परस्परविरोधी गोष्टींमुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या आरोग्याची चर्चा सध्या अमेरिकेत रंगली आहे.