भारतीय कुटुंबाचा अमेरिकेत भयंकर शेवट; आलिशान घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2023 07:32 PM2023-12-30T19:32:09+5:302023-12-30T19:35:59+5:30

आधी श्रीमंत असलेलं हे कुटुंब मागील काही वर्षांपासून आर्थिक संकटाचा सामना करत होतं.

Husband and wife and their 18 year old daughter were found dead in their US home | भारतीय कुटुंबाचा अमेरिकेत भयंकर शेवट; आलिशान घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?

भारतीय कुटुंबाचा अमेरिकेत भयंकर शेवट; आलिशान घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?

नवी दिल्ली : अमेरिकेत एक धक्कादायक घटना घडली असून मूळचे भारतीय असलेले आणि सध्या अमेरिकेत वास्तव्यास असणारे पती-पत्नी आणि त्यांची मुलगी घरात मृतावस्थेत आढळून आली आहे. राकेश कमल (वय ५७), टीना कमल (वय ५४ वर्ष) आणि एरियाना कमल (वय १८ वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. हे कुटुंब तब्बल ५ मिलियन डॉलरच्या एका आलिशान घरात वास्तव्यास होतं. 

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील मॅसाचुसेट्स शहरात वास्तव्यास असलेले राकेश कमल आणि त्यांची पत्नी टीना कमल हे एडुनोवा नावाची कंपनी चालवत होते. मात्र नंतर ती कंपनी बंद पडली. राकेश कमल यांच्या मृतदेहाजवळ एक पिस्तूल सापडलं आहे. या तिघांची कोणी हत्या केली की राकेश यांनी पत्नी आणि मुलीला ठार करून नंतर स्वत:वर गोळी चालवली का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसंच कौटुंबिक वादातून हा सगळा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

स्थानिक प्रशासनाने या घटनेविषयी माहिती देताना सांगितलं की, ही हत्या आहे की आत्महत्या याबाबत लगेच निष्कर्षापर्यंत येण्याआधी आम्ही शवविच्छेदन अहवालाची वाट पाहात आहोत. लवकरच याबाबतचा अहवाल येईल. आधी श्रीमंत असलेलं हे कुटुंब मागील काही वर्षांपासून आर्थिक संकटाचा सामना करत होतं. मागील दोन दिवसांपासून कमल कुटुंबाशी संपर्क होत नसल्याने त्यांचा एक नातेवाईक घरी आला आणि तेव्हा ही घटना उजेडात आली.

दरम्यान, राकेश कमल किंवा कुटुंबातील इतर कोणत्याही सदस्याविरोधात याआधी कसलीही पोलीस तक्रार दाखल नाही. त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला, याबाबत पुढील तपास केला जात असल्याची माहिती स्थानिक पोलिसांकडून देण्यात आली आहे.
 

Web Title: Husband and wife and their 18 year old daughter were found dead in their US home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.