उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 16:45 IST2025-08-17T16:45:06+5:302025-08-17T16:45:35+5:30
Donald Trump news: व्यापार क्षेत्रावरील नॉर्वेचे वृत्तपत्र डेगेन्स नेरिंगस्लिव्हने गुरुवारी वृत्त दिले आहे. यामध्ये ट्रम्प यांनी देशाच्या अर्थमंत्र्यांना फोनवरून धमकी दिल्याचे म्हटले आहे.

उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी पार वेडेपिसे झाले आहेत. एवढे उतावळे झाले आहेत की त्यांनी नॉर्वेच्या अर्थ मंत्र्यांना फोन करून नोबेल पुरस्कार नाही मिळाला तर प्रचंड टेरिफ लादण्याची धमकी देऊन टाकली आहे. गेल्याही महिन्यात ट्रम्प यांनी या मंत्र्यांना टेरिफवरील चर्चेसाठी बोलावले होते, तेव्हाही त्यांनी आपल्याला नोबेल पुरस्कार हवा असल्याचे म्हटले होते.
व्यापार क्षेत्रावरील नॉर्वेचे वृत्तपत्र डेगेन्स नेरिंगस्लिव्हने गुरुवारी वृत्त दिले आहे. यामध्ये ट्रम्प यांनी देशाच्या अर्थमंत्र्यांना फोनवरून धमकी दिल्याचे म्हटले आहे.
इस्रायल -हमास युद्ध थांबविल्याचा दावा ट्रम्प यांनी केला होता. परंतू, हे युद्ध दुसऱ्याच दिवशी पुन्हा सुरु झाले होते. तसेच भारत- पाकिस्तान आणि कंबोडियासह युद्धे थांबविल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. भारताने तो साफ नाकारला आहे, तरीही ट्रम्प सारखे बरळत आहेत. तरीही इस्रायल, पाकिस्तान आणि कंबोडियासह काही देशांनी ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार मिळण्यासाठी नामांकित केले आहे. हा पुरस्कार व्हाईट हाऊसमधील पूर्व राष्ट्राध्यक्षांना मिळाला होता, तो सन्मान ट्रम्प यांनाही हवा झाला आहे.
शांततेचा पुरस्कार मिळविण्यासाठी तो पुरस्कार देणाऱ्या मुळ देशाला तुमच्यावर टेरिफ लादेन अशी धमकी देणे कितपत योग्य आहे, याचा साधा विचारही ट्रम्प यांनी केलेला नाही. याचेच जगाला आश्चर्य वाटत आहे. धक्कादायक म्हणजे नॉर्वेचे अर्थमंत्री जेन्स स्टोल्टनबर्ग ओस्लोच्या रस्त्यावर फिरत असताना त्यांना ट्रम्प यांचा फोन आला होता. नॉर्वेजियन बिझनेस डेलीने या संभाषणाचा खुलासा केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ हा संभाषणाचा विषय बनवला आणि यावेळी त्यांनी नोबेल पुरस्काराबद्दल धमकी दिली. व्हाईट हाऊसने नॉर्वेमधून होणाऱ्या आयातीवर १५% कर लावण्याची घोषणा केली होती, यावरून ही चर्चा सुरु करण्यात आली. परंतू ट्रम्प यांनी विषय टाळत नोबेल द्या नाहीतर आणखी टेरिफ लादू अशी धमकी दिली आहे.