अफगाणिस्तानात भूकेने हाहाकार; अर्धी जनता अन्नाविना, मदतीचा ओघही आटला! नेमकं काय झालं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 12:56 IST2025-12-28T12:54:10+5:302025-12-28T12:56:16+5:30
एकीकडे कडाक्याची थंडी आणि दुसरीकडे बेरोजगारी, अशा कात्रीत अडकलेल्या अफगाणी जनतेसमोर आता दोन वेळच्या अन्नाचा प्रश्न गंभीर झाला आहे.

अफगाणिस्तानात भूकेने हाहाकार; अर्धी जनता अन्नाविना, मदतीचा ओघही आटला! नेमकं काय झालं?
अफगाणिस्तान सध्या इतिहासातील सर्वात भीषण मानवी संकटाचा सामना करत आहे. एकीकडे कडाक्याची थंडी आणि दुसरीकडे बेरोजगारी, अशा कात्रीत अडकलेल्या अफगाणी जनतेसमोर आता दोन वेळच्या अन्नाचा प्रश्न गंभीर झाला आहे. आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस समितीच्या ताज्या अहवालानुसार, २०२५ मध्ये अफगाणिस्तानच्या एकूण लोकसंख्येपैकी अर्ध्याहून अधिक लोक म्हणजेच सुमारे २.२९ कोटी जनता केवळ मदतीच्या आशेवर जगत आहे.
मदतीचा ओघ आटला, संकट वाढले
सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे अफगाणिस्तानला मिळणाऱ्या आंतरराष्ट्रीय निधीत मोठी कपात झाली आहे. अमेरिका आणि इतर देशांनी आपला मदतीचा हात आखडता घेतल्यामुळे 'वर्ल्ड फूड प्रोग्राम'सारख्या संस्था हतबल झाल्या आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न कार्यक्रमाने दिलेल्या इशाऱ्यावरून असे समजते की, या हिवाळ्यात तब्बल १.७ कोटी अफगाणी नागरिकांना तीव्र उपासमारीचा सामना करावा लागत आहे. ही संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत ३० लाखांनी वाढली आहे.
हिवाळ्यात अन्न वाटपावर परिणाम
गेल्या अनेक वर्षांत पहिल्यांदाच अशी स्थिती निर्माण झाली आहे की, हिवाळ्यात होणारे अन्न वाटप जवळपास ठप्प झाले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२४ मध्ये जिथे ५६ लाख लोकांना मदत मिळत होती, तिथे २०२५ मध्ये केवळ १० लाख लोकांपर्यंतच अन्न पोहोचू शकले आहे. निधीअभावी २०२६ मध्ये केवळ ३९ लाख अतिगरजू लोकांवरच लक्ष केंद्रित करावे लागेल, अशी हतबलता युएनने व्यक्त केली आहे.
७१ लाख शरणार्थींच्या परतीचा बोजा
अफगाणिस्तानच्या अडचणीत आणखी भर पडली आहे ती म्हणजे शेजारील देशांतून परतणाऱ्या शरणार्थींमुळे. गेल्या चार वर्षांत ७१ लाख अफगाणी शरणार्थी मायदेशी परतले आहेत. यामुळे देशातील आधीच मर्यादित असलेल्या संसाधनांवर मोठा ताण येत आहे. अशा लाखो लोकांसाठी राहणे, खाणे आणि उपचाराची कोणतीही व्यवस्था सध्यातरी उपलब्ध नाही.
निसर्गाचाही कोप
केवळ राजकीय अस्थिरताच नाही, तर दुष्काळ आणि भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तींनीही अफगाणिस्तानचे कंबरडे मोडले आहे. महागाई गगनाला भिडल्याने सामान्य माणसाला साध्या पिठाची गोणी विकत घेणेही आता अशक्य झाले आहे. जर जगाने वेळेत दखल घेतली नाही, तर अफगाणिस्तानमध्ये भुकेमुळे होणाऱ्या मृत्यूंचा आकडा भयावह ठरू शकतो.