सगळ्यांसमोर गळाभेट, एकाच गाडीतून प्रवास अन् हास्याचा खळखळाट! पुतिन-मोदींची मैत्री पाहून ट्रम्प यांचं टेन्शन वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 13:48 IST2025-09-01T13:43:25+5:302025-09-01T13:48:54+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्यातील केमिस्ट्री इतकी कमाल होती की, त्याची चर्चा फक्त भारतातच नाही, तर जगभरात सुरू आहे.

सगळ्यांसमोर गळाभेट, एकाच गाडीतून प्रवास अन् हास्याचा खळखळाट! पुतिन-मोदींची मैत्री पाहून ट्रम्प यांचं टेन्शन वाढणार
चीनच्या तियानजिन शहरात सुरू असलेल्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) परिषदेत एक अविश्वसनीय दृश्य पाहायला मिळालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्यातील केमिस्ट्री इतकी कमाल होती की, त्याची चर्चा फक्त भारतातच नाही, तर जगभरात सुरू आहे. दोन्ही नेत्यांनी केवळ चार तासांत तब्बल आठ वेळा एकमेकांची भेट घेतली आणि विशेष म्हणजे, एकाच कारमधून प्रवास करून जगातील महाशक्तींना एक मोठा संदेश दिला.
डोनाल्ड ट्रम्प ज्या पुतिन यांची भेट घेण्यासाठी आठ महिने तळमळत होते, त्याच पुतिन यांना मोदी एका दिवसात वारंवार भेटतात, यावरून दोन्ही देशांचे संबंध किती घट्ट आहेत हे दिसून येते. चीनमध्ये झालेली ही भेट अमेरिकेसह संपूर्ण जगासाठी एक मोठा धक्का मानली जात आहे.
एकाच गाडीतून प्रवास
पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती पुतिन यांची भेट अतिशय उत्साहात झाली. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना मिठी मारली आणि नंतर द्विपक्षीय बैठकीसाठी एकाच गाडीतून प्रवास केला. या क्षणाचा फोटो जगभरात व्हायरल झाला. मोदींनी हा फोटो ट्विटरवर शेअर करत लिहिले, “एससीओ परिषदेनंतर मी आणि राष्ट्रपती पुतिन आमच्या द्विपक्षीय बैठकीच्या ठिकाणी एकत्र गेलो. त्यांच्याशी बोलणे नेहमीच ज्ञानवर्धक असते.”
ही भेट अशा वेळी झाली आहे, जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय आयातांवर ५० टक्के टॅरिफ लावले आहेत, ज्यातील अर्धे शुल्क रशियासोबत व्यापार केल्याबद्दल भारतावर दंड म्हणून लादण्यात आले आहेत. ट्रम्प यांच्या या भूमिकेला न जुमानता मोदी आणि पुतिन यांनी एकमेकांना दिलेली साथ जगाला एक वेगळाच संदेश देऊन गेली आहे.
चीन-भारत संबंधातही सुधारणेची शक्यता
मोदी आणि पुतिन यांच्या भेटीत केवळ भारत-रशिया संबंधांवरच नाही, तर भारत आणि चीनच्या संबंधांवरही चर्चा झाली. विशेष म्हणजे, राष्ट्रपती पुतिन यांनी चीनला भारतासोबत संबंध सुधारण्याचा सातत्याने आग्रह धरला आहे. बैठकीच्या आधी मोदी, पुतिन आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग तिन्ही नेते एकत्र भेटले. त्यांच्यात सुमारे दोन मिनिटे संवाद झाला आणि तिघेही खूप आनंदी दिसत होते. यामुळे भविष्यात भारत आणि चीनच्या संबंधांमध्येही सुधारणा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पंतप्रधान मोदींनी पुतिन यांच्यासोबतचे फोटो शेअर करताना लिहिले, "राष्ट्रपती पुतिन यांना भेटून नेहमीच आनंद होतो." या भेटीगाठी आणि सार्वजनिक ठिकाणी दिसलेली त्यांची मैत्री, आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताचे वाढते महत्त्व अधोरेखित करते. यामुळे, ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली अमेरिका एकाकी पडत असताना, भारत आपल्या जुन्या मित्रासोबतची मैत्री आणखी घट्ट करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.