तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 06:06 IST2025-07-20T06:06:00+5:302025-07-20T06:06:17+5:30
‘ट्रिपल डीएनए’मधून जन्माला आलेल्या सर्व बाळांचा जन्म एका विशेष आयव्हीएफ तंत्राद्वारे झाला आहे.

तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग
लंडन : मायटोकॉन्ड्रियल डोनेशनला कायदेशीर मान्यता देणारा पहिला देश बनल्यानंतरच्या एका दशकानंतर, ब्रिटनमध्ये चक्क तीन डीएनए असलेली आठ बाळे जन्माला आली आहेत. तीन डीएनएमधून आठ मुले कशी जन्माला आली ते जाणू घेऊ या.
नेमके काय केले?
‘ट्रिपल डीएनए’मधून जन्माला आलेल्या सर्व बाळांचा जन्म एका विशेष आयव्हीएफ तंत्राद्वारे झाला आहे. यात आईच्या खराब मायटोकॉन्ड्रियल डीएनएची दुरुस्ती करण्यासाठी ‘दुसऱ्या आई’च्या डीएनएचा वापर करण्यात आला. हा डीएनए पेशींना ऊर्जा देणाऱ्या भागाशी म्हणजेच मायटोकॉन्ड्रियाशी जोडलेला आहे, ज्याला पेशीची ‘बॅटरी’ किंवा पॉवरहाउस ऑफ द सेल असेही म्हणतात.
ट्रिपल डीएनएचा उपयोग का?
मायटोकॉन्ड्रियल रिप्लेसमेंट थेरपीमध्ये आईच्या अंड्याचे न्यूक्लिअर डीएनए वेगळे करून, निरोगी मायटोकॉन्ड्रिया असलेल्या दात्याच्या अंड्यात प्रत्यारोपित केले जाते. नंतर हे अंडे वडिलांच्या शुक्राणूंनी फलित केले जाते. या नवीन अंड्यामध्ये दात्याचा मायटोकॉन्ड्रिया आहे, परंतु उर्वरित आनुवंशिक सामग्री जैविक पालकांकडून आहे. ही प्रक्रिया एखाद्या उपकरणातील खराब बॅटरी बदलण्यासारखीच आहे.
मुलाला दोन वडील आणि दोन आई
बहुतेक प्रकरणांमध्ये दोन्ही अंडी एकाच पुरुषाच्या (म्हणजे बाळाच्या वडिलांच्या) शुक्राणूंनी फलित केली जातात. गुंतागुंत टाळण्यासाठी, दात्याच्या अंड्याचे दुसऱ्या पुरुषाच्या शुक्राणूंनी फलन केले जाते. या प्रक्रियेत बाळाला तीन व्यक्तींकडून डीएनए मिळतो. आईकडून, वडिलांकडून आणि डोनर स्त्रीकडून. डोनरचा डीएनए फक्त मायटोकॉन्ड्रियामध्ये असतो आणि तो संपूर्ण डीएनएचा १% पेक्षा कमी असतो.
कायदेशीररीत्या ते मूल आता कोणाचे असेल?
ब्रिटनच्या ह्युमन फर्टिलायझेशन अँड एम्ब्रिओलॉजी अथॉरिटी (एचएफईए) नुसार, मायटोकॉन्ड्रियल दात्यांना कायदेशीररित्या पालक मानले जाणार नाही, कारण त्यांचे योगदान एकूण डीएनएच्या १% पेक्षा कमी आहे. म्हणून, या मुलांना त्यांचा ‘तिसरा डीएनए’ कोणाचा होता हे माहिती करून घेण्याचा अधिकार नसेल.
सध्या सगळं ठीक आहे, पण भविष्य...?
ज्यांचे आनुवंशिक आजारांमुळे हृदय आणि यकृत निकामी होणे, अंधत्व, बहिरेपणा, मधुमेह आणि अकाली मृत्यू होऊ शकतो त्यांच्यासाठी ही तंत्र वरदान आहे. आतापर्यंत जन्मलेली सर्व आठ मुले निरोगी आहात, परंतु प्राण्यांच्या चाचण्यांमधून असे दिसून आले आहे की जर मायटोकॉन्ड्रियल आणि न्यूक्लियर डीएनएमध्ये सुसंवाद नसेल तर भविष्यात समस्या उद्भवू शकतात. दोषपूर्ण मायटोकॉन्ड्रिाही धोका वाढवू शकतो.