इस्रायली लोक भारतीयांपेक्षा किती पटीने श्रीमंत? एका दिवसाची कमाई ऐकून थक्क व्हाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 15:20 IST2026-02-25T15:20:04+5:302026-02-25T15:20:37+5:30
क्षेत्रफळाने भारताच्या एका राज्यापेक्षाही लहान असलेल्या या देशाने आर्थिक प्रगतीत मात्र मोठी भरारी घेतली आहे.

इस्रायली लोक भारतीयांपेक्षा किती पटीने श्रीमंत? एका दिवसाची कमाई ऐकून थक्क व्हाल!
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या इस्रायलच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. या ऐतिहासिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, इस्रायलची अर्थव्यवस्था आणि तिथल्या लोकांचे राहणीमान यावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. क्षेत्रफळाने भारताच्या एका राज्यापेक्षाही लहान असलेल्या या देशाने आर्थिक प्रगतीत मात्र मोठी भरारी घेतली आहे. आकडेवारीनुसार, इस्रायली लोकांचे सरासरी उत्पन्न भारतीयांच्या तुलनेत कित्येक पटीने जास्त आहे.
इस्रायलमध्ये दिवसाची कमाई ९,००० रुपये!
इस्रायलमधील एका व्यक्तीचे सरासरी वार्षिक उत्पन्न सुमारे ४०,००० अमेरिकन डॉलर इतके आहे. भारतीय चलनात हे मूल्य सुमारे ३३ लाख रुपयांपेक्षा जास्त होते. या हिशोबाने इस्रायलमधील सरासरी मासिक पगार २.७ ते २.८ लाख रुपये आहे. धक्कादायक बाब म्हणजे, इस्रायलमध्ये एक सामान्य नागरिक दिवसाला सरासरी ९,००० रुपये कमावतो. अर्थात, हे आकडे सरासरी आहेत, उच्च तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्यांचे उत्पन्न यापेक्षाही कैक पटीने जास्त असू शकते.
भारताची स्थिती काय?
भारताचा विचार केला तर प्रति व्यक्ती उत्पन्न इस्रायलच्या तुलनेत खूपच मागे आहे. भारतात मोठ्या शहरांमध्ये कॉर्पोरेट क्षेत्रात पगार चांगले असले, तरी राष्ट्रीय स्तरावर सरासरी मासिक वेतन १५,००० ते ३०,००० रुपयांच्या दरम्यान आहे. इस्रायल हा 'उच्च उत्पन्न अर्थव्यवस्था' असलेल्या देशांच्या श्रेणीत येतो, तर भारत सध्या 'मध्यम उत्पन्न' गटात आहे.
जीडीपीमधील तफावत
इस्रायलचा प्रति व्यक्ती जीडीपी ४०,००० डॉलरच्या आसपास आहे. भारताचा आकडा याच्या जवळपासही नाही. इस्रायलची लोकसंख्या कमी आणि तंत्रज्ञानावर आधारित उद्योग जास्त असल्याने तिथला प्रत्येक नागरिक आर्थिकदृष्ट्या अधिक संपन्न दिसतो.
कमाई जास्त तर खर्चही मोठा!
केवळ कमाईच नाही, तर इस्रायलमध्ये जगण्याचा खर्चही भारतापेक्षा कितीतरी जास्त आहे. तिथे सामान्य जीवनशैलीसाठी एका व्यक्तीला महिन्याला ३३,००० ते ५०,००० रुपये खर्च करावे लागतात. तेल अवीवसारख्या शहरात घरांचे भाडे आणि इतर खर्च यापेक्षाही जास्त आहेत. भारतात मात्र लहान शहरे आणि गावांमध्ये राहण्याचा खर्च तुलनेने खूपच कमी आहे.
इस्रायल का ठरला श्रीमंत?
इस्रायलला 'स्टार्टअप नेशन' म्हटले जाते. संरक्षण, सायबर सुरक्षा, कृषी तंत्रज्ञान आणि वैद्यकीय संशोधन या क्षेत्रात इस्रायल जगाचे नेतृत्व करतो. तिथल्या शिक्षण पद्धतीमध्ये संशोधनावर सर्वाधिक खर्च केला जातो. यामुळेच उच्च पगाराच्या नोकऱ्या तिथे उपलब्ध आहेत आणि त्यांची अर्थव्यवस्था सातत्याने मजबूत होत आहे. पंतप्रधानांच्या या दौऱ्यामुळे भारतालाही इस्रायलच्या या प्रगत तंत्रज्ञानाचा आणि आर्थिक धोरणांचा फायदा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.