१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 06:34 IST2026-04-09T06:33:32+5:302026-04-09T06:34:09+5:30

आजही त्यांच्याकडे हजारो आत्मघाती ड्रोन उपलब्ध आहेत

How does Iran's strength remain even after 12,300 attacks? These are the reasons behind it | १२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं

१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं

अमेरिका आणि इस्रायल मिळून इराणचा काही तासांत खात्मा करतील अशी अटकळ बांधली जात होती. खुद्द अमेरिकेनं तर अशा अनंत वल्गना केल्या आणि डरकाळ्या फोडल्या; पण इराणनं त्यांचे हे मनसुबे नुसते मातीतच मिसळविले नाहीत, तर त्यांना तोडीस तोड उत्तर दिलं. पण, इराणकडे असं काय होतं किंवा आहे की इतक्या चिवटपणे त्यानं अमेरिका आणि इस्रायलच्या प्रचंड हल्ल्यांना तोंड देत त्यांनाही जेरीस आणलं? सलग सहा आठवड्यांपासून सुरू असलेल्या अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यांनंतरही इराणची लष्करी क्षमता संपलेली नाही. खुद्द अमेरिकन गुप्तचर खात्याच्याच अहवालानुसार इराणचे जवळपास ५० टक्के लॉन्चर अजूनही अत्यंत सुरक्षित आहेत. बोगद्यांमध्ये आणि गुहांमध्ये त्यांनी लपविलेल्या क्षेपणास्त्रांना अमेरिका आणि इस्रायल अजून हातही लावू शकलेले नाहीत. आजही त्यांच्याकडे हजारो आत्मघाती ड्रोन उपलब्ध आहेत.

गुप्तचर अहवालानुसार काही लॉन्चर असे आहेत, जे हल्ल्यांनंतर जमिनीखाली दबले गेलेत; पण नष्ट झालेले नाहीत. याशिवाय किनारी संरक्षणासाठी वापरली जाणारी क्रूज मिसाइल्सही त्यांच्याकडे मोठ्या संख्येने उपलब्ध आहेत, ज्यामुळे होर्मुझमध्ये जहाजांसाठी धोका कायम आहे. ट्रम्प यांनी अनेकदा दावा केला की, इराणची मिसाइल आणि ड्रोन क्षमता मोठ्या प्रमाणात संपविली गेली आहे आणि त्याची शस्त्रनिर्मिती केंद्रं उद्ध्वस्त करण्यात आली आहेत, पण वस्तुस्थिती मात्र तशी नाही. सीएनएननंही आपल्या अहवालात याची पुष्टी केली आहे. 

अमेरिकेच्याच सेंट्रल कमांडनुसार इराणच्या १२,३०० पेक्षा जास्त ठिकाणांवर हल्ले करण्यात आले आहेत, तरीही इराणची युद्धक्षमता अजूनही शाबूत आहे. इस्रायलचा अंदाज आहे की, इराणचे केवळ २० ते २५ टक्के लॉन्चर सक्रिय आहेत, मात्र विविध बोगदे आणि गुहांमध्ये लपविलेली क्षेपणास्त्रे, युद्ध साहित्य आणि सुरक्षा प्रणाली यांचा यात समावेश नाही.

इराणच्या रणनीतीचा महत्त्वाचा भाग म्हणजे त्यांची भूमिगत ठिकाणं. त्यांनी आपली मिसाइल्स आणि लॉन्चर्स डोंगरदऱ्या, भूमिगत बोगदे आणि गुहांमध्ये अशा ठिकाणी लपवून ठेवली आहेत, की तिथपर्यंत पोहोचणं आणि ती नष्ट करणं सहज शक्य नाही. मुळात ती शोधणं हीच अतिशय कठीण बाब आहे. कारण आजच्या आधुनिक तंत्रज्ञानालाही त्यांनी चकमा दिला आहे. दुसरं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे येनकेन प्रकारे अमेरिका आणि इस्रायल यांना त्यांच्या शस्त्रास्त्रांचा माग लागलाच, आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं ती जागा त्यांना कळलीच, तरीही ज्याप्रमाणे सैनिक आपली जागा सतत बदलत असतात, त्याचप्रमाणे इराणही आपली शस्त्रास्त्रे आणि मोबाइल लॉन्चर्सची ठिकाणं वेगानं बदलत असतो. त्यामुळे त्यांच्यावर निशाणा साधणं आणखीच अवघड झालं आहे. अधिकाऱ्यांच्या मते इराणकडे अजूनही इतकी बॅलेस्टिक मिसाइल्स आणि लॉन्चर्स आहेत की तो इस्रायल आणि प्रदेशातील इतर ठिकाणांवर घातक हल्ले करू शकतो.

होर्मुझ जलसंधी पूर्णपणे सुरक्षित करणंही अवघड आहे, कारण इराणची किनारी मिसाइल क्षमता संपलेली नाही आणि तीही भूमिगत ठिकाणांमध्ये लपविलेली असण्याची शक्यता आहे. जिथे इराणच्या नियमित नौदलाला मोठं नुकसान झालं आहे, तिथे रिव्होल्युशनरी गार्डची सागरी ताकद अजूनही मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे. त्यांच्याकडे शेकडो लहान नौका आणि मानवरहित नौका आहेत, ज्यांचा वापर समुद्री मार्ग अडविण्यासाठी केला जाऊ शकतो.

Web Title : 12,300 हमलों के बाद भी ईरान की ताकत कैसे बरकरार? ये हैं कारण

Web Summary : कई हमलों के बावजूद, ईरान भूमिगत सुविधाओं, मोबाइल लांचर और शेष मिसाइल क्षमताओं के कारण अपनी सैन्य ताकत बनाए हुए है। तटीय रक्षा और नौसेना बल भी उनके लचीलेपन में योगदान करते हैं, जिससे क्षेत्र में विरोधियों के लिए चुनौतियां खड़ी होती हैं।

Web Title : Iran's enduring power despite 12,300 attacks: The reasons why.

Web Summary : Despite numerous attacks, Iran maintains its military strength due to underground facilities, mobile launchers, and remaining missile capabilities. Coastal defense and naval forces also contribute to their resilience, posing challenges for adversaries in the region.