'हाउसेस इन हॅम्पस्टेड'ची विक्रमी दराने विक्री; एफ. एन. सूझांच्या कलाकृतीची आजवरची सर्वोच्च किंमत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 12:59 IST2025-10-03T12:59:22+5:302025-10-03T12:59:38+5:30
गोमंतकीय सुप्रसिद्ध चित्रकार फ्रान्सिस न्यूटन सूझा यांच्या ‘हाउसेस इन हॅम्पस्टेड’ या निसर्गचित्राला लंडनमधील सोथेबीजच्या लिलावात तब्बल ७.५ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स (सुमारे ६३ कोटी रुपये) इतकी किंमत मिळाली.

'हाउसेस इन हॅम्पस्टेड'ची विक्रमी दराने विक्री; एफ. एन. सूझांच्या कलाकृतीची आजवरची सर्वोच्च किंमत!
लंडन : गोमंतकीय सुप्रसिद्ध चित्रकार फ्रान्सिस न्यूटन सूझा यांच्या ‘हाउसेस इन हॅम्पस्टेड’ या निसर्गचित्राला लंडनमधील सोथेबीजच्या लिलावात तब्बल ७.५ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स (सुमारे ६३ कोटी रुपये) इतकी किंमत मिळाली. ही रक्कम मूळ बोली लावलेल्या किमतीपेक्षा जवळपास सातपट अधिक असून, सूझांच्या कलाकृतीसाठीची ही आतापर्यंतची सर्वोच्च लिलाव किंमत ठरली आहे.
‘मॉडर्न अँड कंटेम्पररी साऊथ एशियन आर्ट’ या लिलावात सूझांचे दुसरे चित्र ‘एम्परर’ देखील तब्बल ६.९ दशलक्ष डॉलर्सना विकले गेले. यंदा लिलावासाठी ठेवलेल्या सूझांच्या पाचही चित्रांना मिळून १४.६ दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त किंमत मिळाली.
या कलाकारांच्या कलाकृतींचाही समावेश
लिलावात वासुदेव गायतोंडे, एम. एफ. हुसेन, सैयद हैदर रझा, गणेश पाइन, जगदीश स्वामिनाथन आणि नारायण श्रीधर बेंद्रे यांच्या कलाकृतींचाही समावेश होता. एकूण लिलावातून २५.५ दशलक्ष डॉलर्स इतकी विक्रमी रक्कम जमा झाली.
३० वर्षांतील सर्वाेच्च कमाई
सोथेबीजच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, दक्षिण आशियाई कलेच्या लिलावातील ही ३० वर्षांतील सर्वोच्च कमाई असून, सात विक्रम झाले. हुसेन यांचे ‘चित्तोर किल्ला’ हे चित्र १.३ दशलक्ष डॉलर्सला विकले गेले, तर गणेश पाइन यांच्या ‘द ड्रीम काँव्हर्सेशन’ या चित्रालाही विक्रमी किंमत मिळाली.
महत्त्वाचे आकडे
७.५ दशलक्ष डॉलर्स – सूझा यांच्या ‘हाउसेस इन हॅम्पस्टेड’ चित्राची किंमत
६.९ दशलक्ष डॉलर्स – सूझा यांच्या ‘एम्परर’ चित्राची किंमत
१४.६ दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त – सूझा यांच्या पाच चित्रांची एकत्रित कमाई
२५.५ दशलक्ष डॉलर्स – संपूर्ण लिलावातील एकूण रक्कम
७ जागतिक विक्रम – यंदाच्या लिलावात प्रस्थापित