अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 23:09 IST2025-08-24T23:08:06+5:302025-08-24T23:09:04+5:30
अमेरिकेतील एका भीषण रस्ते अपघाताने पंजाब मधील एका कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
अमेरिकेतील एका भीषण रस्ते अपघाताने पंजाब मधील एका कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. या अपघातानंतर अटक करण्यात आलेल्या पंजाबमधील ट्रक चालक हरजिंदर सिंहला ४५ वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता आहे. यामुळे त्याचे कुटुंबीय आणि मूळ गावचे लोक चिंतेत आहेत. हरजिंदरच्या पाठीशी उभे राहण्यासाठी त्याचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी अमेरिकन कोर्टाला दयाळू दृष्टिकोन दाखवण्याची विनंती केली आहे.
अपघातात ३ जणांचा मृत्यू
माध्यमांच्या वृत्तानुसार, हा अपघात १२ ऑगस्ट रोजी फ्लोरिडामध्ये घडला. हरजिंदरवर निष्काळजीपणे वाहन चालवून तीन लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप आहे. फोर्ट पियर्स महामार्गावर त्याने अचानक चुकीच्या पद्धतीने यू-टर्न घेतला, ज्यामुळे पाठीमागून येणारी मिनी व्हॅन त्याच्या ट्रकवर आदळली. या अपघातात तीन लोकांचा जागीच मृत्यू झाला, तर हरजिंदर आणि त्याच्यासोबत असलेला एक प्रवासी बचावले.
कोर्टाने जामीन नाकारला!
अपघातानंतर हरजिंदर कॅलिफोर्नियाला पळून गेला होता, परंतु त्याला अटक करून खटल्यासाठी फ्लोरिडाला आणण्यात आले. त्याच्यावर तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सेंट लुसी काउंटीच्या न्यायाधीश लॉरेन स्वीट यांनी त्याचा जामीन अर्ज फेटाळला, कारण हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचे कोर्टाने म्हटले आहे.
कुटुंब आणि गावकऱ्यांची मदत करण्याची विनंती
हरजिंदरचा नातेवाईक दिलबाग सिंह म्हणाला की, "अपघातात तीन लोकांच्या मृत्यूमुळे आम्हीही दुःखी आहोत. हरजिंदरचे वय केवळ २८ आहे. जर त्याला ४५ वर्षांची शिक्षा झाली, तर त्याच्या कुटुंबाची काय अवस्था होईल, याची कल्पनाच केलेली बरी." त्यांनी शीख संघटनांना हरजिंदरला मदत करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे.
गावातील सरपंच जशनदीप सिंह यांनीही सांगितले की, "हरजिंदरकडून चूक झाली हे मान्य आहे, पण त्याला कठोर शिक्षा देऊ नये." २०१८मध्ये जमीन गहाण ठेवून हरजिंदर अमेरिकेला गेला होता. त्याचे वडील हयात नाहीत आणि त्याची आई व भाऊ तेजिंदर सिंह शेती करून उदरनिर्वाह करतात.
खासदार हरसिमरत कौर बादल यांचे परराष्ट्र मंत्र्यांना पत्र
भटिंडाच्या शिरोमणी अकाली दलच्या खासदार हरसिमरत कौर बादल यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना विनंती केली आहे की, हरजिंदरला योग्य कायदेशीर सल्लागारांची मदत मिळावी, जेणेकरून त्याचा खटला प्रभावीपणे मांडता येईल.