पाकिस्तानातील दक्षिण वझिरीस्तानमध्ये दहशतवाद्यांचा मोठा हल्ला; लष्कराची बस उडवली, १२ सैनिक ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 16:01 IST2025-09-13T15:40:39+5:302025-09-13T16:01:00+5:30
पाकिस्तानातील दक्षिण वझिरीस्तानमध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे.

(प्रातिनिधीक छायाचित्र)
Pakistan Terrorist Attack:पाकिस्तानातील दक्षिण वझिरीस्तानमध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. दक्षिण वझिरीस्तानमधील बदर व्हॅलीच्या वरच्या जिल्ह्यात लष्करी ताफ्यावर हा भयानक हल्ला करण्यात आला. पाकिस्तानी तालिबानने केलेल्या हल्ल्यात किमान १२ सैनिक ठार झाले. स्थानिक प्रशासन आणि सुरक्षा अधिकाऱ्यांनी या घटनेची माहिती दिली. तर चार जण जखमी झाले आहेत. दक्षिण वझिरीस्तान जिल्ह्यात पहाटे ४ वाजताच्या सुमारास लष्कराचा ताफा त्या भागातून जात असताना हा हल्ला झाला. दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला, ज्यामध्ये १२ सुरक्षा कर्मचारी ठार झाले आणि चार जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने सोशल मीडियाद्वारे या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. हा हल्ला अलिकडच्या काही महिन्यांतील खैबर पख्तूनख्वा प्रांतातील सर्वात मोठ्या हल्ल्यांपैकी एक आहे. हा हल्ला अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आला. हल्ला इतका तीव्र होता की सैनिकांना जीव वाचवता आला नाही.
हल्ल्यादरम्यान दहशतवाद्यांनी पाकिस्तानी सैनिकांकडून शस्त्रेही हिसकावून घेतली. या हल्ल्यामुळे परिसरात सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिक प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांकडून परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी शोध मोहीम राबवली जात आहे. नागरिकांना परिसरात सतर्क राहण्याचे आणि कोणत्याही संशयास्पद हालचालींची माहिती देण्याचे आवाहन केले आहे.
तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान खैबर पख्तूनख्वा प्रांतात मोठ्या प्रमाणात अस्तित्व होते. मात्र २०१४ मध्ये पाकिस्तानी सैन्याने केलेल्या मोठ्या कारवाईनंतर त्यांना माघार घ्यावी लागली. २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबान पुन्हा सत्तेत आल्यापासून, सीमावर्ती भागात दहशतवादी कारवाया वाढत आहेत. टीटीपी आणि अफगाण तालिबान या वेगवेगळ्या संघटना असल्या तरी त्यांचे जवळचे संबंध आहेत. पाकिस्तान सतत अफगाणिस्तानवर तिथे असलेल्या दहशतवाद्यांना संपवण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करतोय. हेच दहशतवादी पाकिस्तानमध्ये हल्ले करतात असा आरोप आहे. दुसरीकडे, काबूल प्रशासन हे आरोप फेटाळत आहे.
काही दिवसांपूर्वी खैबर पख्तूनख्वाच्या अनेक जिल्ह्यांमधील इमारतींच्या भिंतींवर टीटीपीच्या नावाचे पोस्टर्स दिसू लागले आहेत, ज्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये भीती वाढली आहे. तालिबानने या प्रदेशावर कब्जा केला होता. त्यामुळे ती वेळ पुन्हा परत येऊ शकते अशी भीती निर्माण झाली आहे. गेल्या काही महिन्यांत टीटीपीच्या दहशतवाद्यांच्या हालचाली आणि हल्ले वाढले आहेत.