मालदीव बोट अपघात: गौतम सिंघानिया थोडक्यात बचावले, पण भारताचे दोन दिग्गज सुपुत्र बेपत्ता; शोधकार्य युद्धपातळीवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 14:23 IST2026-03-23T14:17:16+5:302026-03-23T14:23:26+5:30
मालदीवमध्ये झालेल्या भीषण नौका अपघातात भारतीय हरी सिंग आणि कमांडर महेश रामचंद्रन अद्याप बेपत्ता आहेत.

मालदीव बोट अपघात: गौतम सिंघानिया थोडक्यात बचावले, पण भारताचे दोन दिग्गज सुपुत्र बेपत्ता; शोधकार्य युद्धपातळीवर
Maldives Boat Crash:मालदीवच्या समुद्रात एका भीषण अपघाताने खळबळ उडाली आहे. रेमंड समूहाचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती गौतम सिंघानिया यांच्या ताफ्यातील एका हाय-स्पीड बोटीला झालेल्या अपघातात भारताचे दोन जण अद्याप बेपत्ता आहेत. भारताचे रॅली किंग मानले जाणारे हरी सिंग आणि अर्जुन पुरस्कार विजेते नौसैनिक कमांडर महेश रामचंद्रन यांचा शोध घेण्यासाठी मालदीव कोस्ट गार्डने समुद्रात शोधमोहीम तीव्र केली आहे.
गुरुवारी मध्यरात्री उशिरा, टीटी अशेना या लक्झरी यॉटकडे प्रवाशांना घेऊन जाणारी एक वेगवान बोट वावू अटोलजवळ अचानक उलटली. केयोधू बेटापासून साधारण दोन नॉटिकल मैल अंतरावर हा अपघात झाला. बोटीत एकूण ७ जण स्वार होते, ज्यात ५ भारतीय पुरुष, एक ब्रिटिश महिला आणि एका रशियन महिलेचा समावेश होता. बोट उलटल्यानंतर पाच जण समुद्रात फेकले गेले, तर काहींना वाचवण्यात यश आले.
बेपत्ता असलेले दोनजण कोण?
या अपघातामुळे क्रीडा आणि नौदल वर्तुळात चिंतेचे ढग दाटले आहेत, कारण बेपत्ता असलेल्या व्यक्ती सामान्य नाहीत. हरी सिंग हे आशिया झोन रॅली चॅम्पियनशिप जिंकणारे ते पहिले भारतीय असून त्यांनी ५ वेळा राष्ट्रीय जेतेपद पटकावले आहे. सध्या ते तरुण ड्रायव्हर्सना मार्गदर्शन करण्याचे काम करत होते. तर कमांडर महेश रामचंद्रन हे माजी नौदल वैमानिक आणि अर्जुन पुरस्कार विजेते खलाशी आहेत. सिंघानिया यांच्या अशेना या सुपरयॉटचे ते कॅप्टन म्हणून जबाबदारी सांभाळत होते.
गौतम सिंघानिया सुरक्षित, इतरांना गंभीर दुखापत
या अपघातातून उद्योगपती गौतम सिंघानिया थोडक्यात बचावले आहेत. त्यांना किरकोळ जखमा झाल्या असून प्राथमिक उपचारानंतर ते मुंबईला परतले आहेत. मात्र, इतर प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे. एका भारतीय प्रवाशाला या भीषण अपघातात आपला हात गमवावा लागला असून, त्यांना तातडीने पुढील उपचारांसाठी एअरलिफ्ट करून भारतात आणण्यात आले आहे.
हजारो मैलांचा परिसर पिंजून काढला
मालदीव नॅशनल डिफेन्स फोर्सच्या कोस्ट गार्ड स्क्वॉड्रनने ही मोहीम हाती घेतली आहे. हजारो चौरस नॉटिकल मैल क्षेत्राचा शोध घेण्यात आला आहे. तज्ज्ञ डायव्हर्स समुद्राच्या तळाशी शोध घेत आहेत. स्थानिक पोलीस आणि नौदल अधिकारी अहोरात्र काम करत असले तरी, अद्याप हरी सिंग आणि रामचंद्रन यांचा कोणताही पत्ता लागलेला नाही.
क्रीडा विश्वातून प्रार्थनांचा ओघ
हरी सिंग यांच्या बेपत्ता होण्याच्या बातमीने मोटरस्पोर्ट करणाऱ्यांना हादरा बसला आहे. ते केवळ एक चॅम्पियन नव्हते, तर मार्गदर्शक होते, अशा भावना त्यांचे सहकारी व्यक्त करत आहेत. दुसरीकडे, भारतीय नौदलातील मित्रपरिवार कमांडर रामचंद्रन यांच्या अनुभवावर विश्वास ठेवून ते सुखरूप परततील, अशी आशा व्यक्त करत आहेत.