गृहमंत्र्यांचा राजीनामा, २० जणांचा मृत्यू, सोशल मीडियावरील बंदी उठवली; नेपाळमध्ये काय काय घडले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 09:04 IST2025-09-09T09:02:15+5:302025-09-09T09:04:32+5:30

सोमवारी नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीच्या विरोधात झालेल्या हिंसक निदर्शनांमध्ये किमान २० जणांचा मृत्यू झाला आणि ३०० हून अधिक जण जखमी झाले. परिस्थिती बिकट झाल्याने राजधानी काठमांडूमध्ये सैन्य तैनात करावे लागले.

Home Minister resigns, 20 people die, social media ban lifted What happened in the protests in Nepal? | गृहमंत्र्यांचा राजीनामा, २० जणांचा मृत्यू, सोशल मीडियावरील बंदी उठवली; नेपाळमध्ये काय काय घडले?

गृहमंत्र्यांचा राजीनामा, २० जणांचा मृत्यू, सोशल मीडियावरील बंदी उठवली; नेपाळमध्ये काय काय घडले?

नेपाळमध्ये सोमवारी  सोशल मीडिया साइट्सवरील सरकारने घातलेल्या बंदीविरोधात तरुणांनी केलेल्या हिंसक निदर्शनांमुळे परिस्थिती आणखी बिकट झाली. पोलिसांच्या कारवाईत २० जणांचा मृत्यू झाला असून ३०० हून अधिक लोक जखमी झाले. दरम्यान, गृहमंत्री रमेश लेखक यांनी राजीनामा दिला. परिस्थिती बिकट होताच, राजधानी काठमांडूमध्ये नेपाळी सैन्य तैनात करावे लागले. बानेश्वरमधील नवीन संसद संकुलाच्या आसपासच्या रस्त्यांचा ताबा लष्कराने घेतला आहे.

GEN-Z च्या आंदोलनापुढे नेपाळ सरकार झुकले; सोशल मीडियावरील बंदी उठवली

पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी मृत्यूंबद्दल दुःख व्यक्त केले. 'शांततापूर्ण निषेधात काही अवांछित घटकांच्या घुसखोरीमुळे हिंसाचार झाला आणि सार्वजनिक मालमत्ता वाचवण्यासाठी सरकारला बळाचा वापर करावा लागला',असा दावाही त्यांनी केला. सरकारचे उद्दिष्ट सोशल मीडिया साइट्सवर बंदी घालणे नाही तर त्यांचे नियमन करणे आहे. त्यांनी १५ दिवसांत अहवाल सादर करणारी चौकशी समिती स्थापन करण्याची घोषणाही केली.

सोशल मीडियावरील बंदी मागे घेतली


या निदर्शनानंतर नेपाळमधील सोश मीडियावरील बंदी मागे घेतली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री पृथ्वी सुब्बा गुरुंग यांनी तातडीच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर ही घोषणा केली. सरकारने सोशल मीडियावरील बंदी मागे घेतली आहे आणि संबंधित एजन्सींना प्लॅटफॉर्म पुन्हा सुरू करण्याची प्रक्रिया त्वरित सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असंही त्यांनी सांगितले. त्यांनी आंदोलकांना निदर्शने संपवण्याचे आवाहनही केले.

काठमांडूमध्ये शालेय विद्यार्थ्यांसह हजारो तरुणांनी 'Gen Z ' च्या बॅनरखाली संसदेसमोर निदर्शने केली. यावेळी त्यांनी सरकारविरोधी घोषणा दिल्या. काही निदर्शक संसदेच्या आवारात घुसले तेव्हा पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी पाण्याच्या, अश्रूधुराचा आणि रबर गोळ्यांचा वापर केला.

निदर्शकांचा मृत्यू आणि गृहमंत्र्यांचा राजीनामा 

मिळालेल्या माहितीनुसार, काठमांडूमध्ये झालेल्या संघर्षात १७ जणांचा आणि सुनसरी जिल्ह्यात पोलिसांच्या गोळीबारात २ जणांचा मृत्यू झाला. हिंसक निदर्शने पोखरा, बुटवल, भरतपूर, इटहरी आणि दमक येथे पसरली. प्राणघातक संघर्षानंतर नेपाळ काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधित्व करणारे गृहमंत्री रमेश लेखक यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला. त्यांनी संध्याकाळी पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधान ओली यांना हा राजीनामा सादर केला.

रुग्णालयात जागा मिळत नाहीत

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय ट्रॉमा सेंटरमध्ये आठ, एव्हरेस्ट आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्रत्येकी तीन, काठमांडू मेडिकल कॉलेजमध्ये दोन आणि त्रिभुवन टीचिंग हॉस्पिटलमध्ये एकाचा मृत्यू झाला. एकूण ३४७ हून अधिक जखमींवर देशभरातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. अनेक मोठ्या रुग्णालयांमध्ये जागा कमी पडत आहेत. रुग्णांना इतर रुग्णालयांमध्ये पाठवले जात आहे.

Web Title: Home Minister resigns, 20 people die, social media ban lifted What happened in the protests in Nepal?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nepalनेपाळ