हाफिज सईदला 'सुटीसाठी' दुसरीकडे पाठवा! चीनची पाकिस्तानकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2018 15:05 IST2018-05-24T13:45:50+5:302018-05-24T15:05:07+5:30
दहशतवादी हाफिज सईदला पश्चिम आशियाई देशात पाठवावे असे चीनने सूचवले आहे.

हाफिज सईदला 'सुटीसाठी' दुसरीकडे पाठवा! चीनची पाकिस्तानकडे मागणी
बीजिंग- मुंबईत 26/11 या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिज सईद पाकिस्तानात मुक्त वावर करत आहे. भारताने वारंवार विनंती करुनही पाकिस्तानने त्याला अभय दिले आहे. सभा भरवणे, भाषणं करणे असे कार्यक्रम त्याने बिनधोक चालवले आहेत. आता यामध्ये चीननेही उडी घेतली असून त्याला पश्चिम आशियाई पाठवा अशी मागणी चीनने केली आहे. मात्र चीनने हे आरोप फेटाळले आहेत.
दहशतवादाचा मार्ग अवलंबून सर्व जगाला त्रास देणाऱ्या हाफिज सईदला "शांततेत" जगता यावे यासाठी आणि त्यानं स्थलांतर केलं तर आंतरराष्ट्रीय सूत्रांचं त्याच्यावरचं लक्ष कमी होईल असं चीनने पाकिस्तानला सांगितल्याचं द हिंदूने वृत्त प्रसिद्ध केले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खान अब्बासी यांना चीनचे राष्ट्राध्यक्ष शी. जिनपिंह यांनी एप्रिल महिन्यामध्ये चीनमध्ये झालेल्या चर्चेत हे सुचवल्याचे यात म्हटले आहे.
सईदवरील सर्वांचं लक्ष बाजूला जावं यासाठी लवकरात लवकर उपाय काढा असे अब्बासी यांना चीनचे अध्यक्ष शी. जिनपिंग सांगितल्याचे अब्बासी यांच्या निकटच्या सूत्रांनी सांगितल्याचे यामध्ये म्हटले आहे. हाफिज सईद हा लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचा नेता आहे. संयुक्त राष्ट्राने या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. तसेच अमेरिका व भारतानेही या संघटनेला दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. मुंबईत 26-11 रोजी झालेल्या हल्ल्याचा तो सूत्रधार होता. त्याच्यावर 50 लाख डॉलर्सचे बक्षिस लावण्यात आले आहे.
त्याला पाकिस्तानच्या राजकारणात प्रवेश करुन आगामी निवडणुकीत स्वतःचे उमेदवार निवडून पाठवायचे आहेत असेही पाकिस्तानात सांगितले जाते. गेल्या वर्षी त्याची नजरकैदेतून सूटका झाली होती. भारत आणि अमेरिकेने पाकिस्तानच्या या कृतीचा तीव्र निषेध केला होता. भारताविरोधात प्रचारसभा घेणं, भारतावर आरोप करणं हे त्याचे कार्यक्रम अगदी निर्धोक चालले आहेत.