लादेनच्या डोक्यात अमेरिकी नेव्ही सीलनेच गोळी झाडली होती, हे इतिहास विसरणार नाही : ट्रम्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 05:54 IST2025-10-07T05:54:14+5:302025-10-07T05:54:28+5:30
न्यूयॉर्क/वॉशिंग्टन : अमेरिकन नेव्ही सीलनेच अल-कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनच्या लपण्याच्या ठिकाणी हल्ला केला आणि त्याच्या डोक्यात गोळी झाडली, ...

लादेनच्या डोक्यात अमेरिकी नेव्ही सीलनेच गोळी झाडली होती, हे इतिहास विसरणार नाही : ट्रम्प
न्यूयॉर्क/वॉशिंग्टन : अमेरिकन नेव्ही सीलनेच अल-कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनच्या लपण्याच्या ठिकाणी हल्ला केला आणि त्याच्या डोक्यात गोळी झाडली, हे इतिहास कधीही विसरणार नाही, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.
२००१ मध्ये अल-कायदाच्या दहशतवाद्यांनी वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या ट्विन टॉवर्सवर हल्ला करण्याच्या एक वर्ष आधी मी बिन लादेनबद्दल इशारा दिला होता, याचा पुनरुच्चार ट्रम्प यांनी केला. ते रविवारी व्हर्जिनियातील नॉरफोक येथे अमेरिकन नौदलाच्या २५० व्या
वर्धापन दिनानिमित्त आयोजित समारंभात बोलत होते.
अमेरिका जिंकली असती...
माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानातून अमेरिकेच्या माघारीवर टीका करताना ट्रम्प म्हणाले की, अमेरिकेला सहजपणे अफगाणिस्तान जिंकता आले असते. आपण युद्ध सहज जिंकू शकलो असतो.
मे २०११ मध्ये लादेन ठार
मे २०११ मध्ये अमेरिकन नेव्ही सीलने पाकिस्तानातील अबोटाबाद येथील एका घरात लपून बसलेल्या बिन लादेनला ठार मारले. ही कारवाई तत्कालीन अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळात झाली. त्या कारवाईला अमेरिकेने ऑपरेशन नेप्च्युन स्पिअर असे नाव दिले होते.
‘हल्ल्याच्या एक वर्ष आधीच मी लादेनवर लक्ष ठेवण्यास सांगितले होते’
ट्रम्प म्हणाले की, मी ९/११ हल्ल्याच्या एक वर्ष आधी अधिकाऱ्यांना बिन लादेनवर लक्ष ठेवण्यास सांगितले होते. वर्ल्ड ट्रेड सेंटर हल्ल्याच्या अगदी एक वर्ष आधी मी ओसामा बिन लादेनबद्दल लिहिले होते.
मी म्हणालो होतो, तुम्हाला ओसामा बिन लादेनवर लक्ष ठेवावे लागेल. मी ओसामा नावाचा एक माणूस पाहिला होता, मला तो आवडत नव्हता. मी म्हटले होते की, त्याच्यावर लक्ष ठेवावे लागेल. त्यांनी तसे केले नाही. एका वर्षानंतर, त्याने वर्ल्ड ट्रेड सेंटर उडवून दिले.
म्हणून मी काही श्रेय घेतले पाहिजे, कारण दुसरे कोणीही मला ते देणार नाही. अमेरिकन नौदलाने यूएसएस कार्ल विन्सनमधून बिन लादेनचा मृतदेह समुद्रात टाकला.