बांगलादेशात हिंदूंचं जगणं कठीण! एकाला खांबाला बांधून अमानुष मारहाण, प्रकृती चिंतानजक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 17:01 IST2026-01-03T16:59:36+5:302026-01-03T17:01:59+5:30
Bangladesh News: भारताच्या शेजारील देश असलेल्या बांगलादेशात हिंदूंवरील हिंसाचाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत.

बांगलादेशात हिंदूंचं जगणं कठीण! एकाला खांबाला बांधून अमानुष मारहाण, प्रकृती चिंतानजक
भारताच्या शेजारील देश असलेल्या बांगलादेशात हिंदूंवरील हिंसाचाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. गाजीपूरमधील टोंगी भागात एका हिंदू भिकाऱ्याला जमावाने खांबाला बांधून अमानुष मारहाण केल्याची संतापजनक घटना समोर आली. शिवाय, जमावाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या खोकन दास या हिंदू व्यक्तीचा ढाका येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गाजीपूरमधील टोंगी येथे शुक्रवारी चोरीच्या संशयावरून जमावाने सुमन नावाच्या एका व्यक्तीला पकडले. जमावाने त्याला केवळ पकडलेच नाही, तर एका खांबाला बांधून लाथाबुक्क्यांनी आणि काठ्यांनी बेदम मारहाण केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमन हा रस्त्यावर भिक्षा मागून उदरनिर्वाह करणारा व्यक्ती आहे. त्याचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही. जमावाच्या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. केवळ सुमन या नावावरून तो हिंदू असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले.
बांगलादेशातून आणखी एक दुर्दैवी बातमी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी खोकन दास नावाच्या हिंदू व्यक्तीवर जमावाने चाकूने हल्ला केला होता. हल्लेखोर एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी खोकन यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी जवळच्या तलावात उडी मारली होती. मात्र, शनिवारी ढाका येथील रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांची प्राणज्योत मालवली.
पश्चिम बंगाल भाजपकडून तीव्र संताप
या घटनांचे पडसाद भारतातही उमटले आहेत. पश्चिम बंगाल भाजपने सोशल मीडियावर पोस्ट करत या हत्यांचा तीव्र निषेध केला. "दीपू चंद्र दास यांच्यानंतर आता खोकन दास यांचाही मृत्यू झाला आहे. बांगलादेश आणि पश्चिम बंगालमध्ये बंगाली हिंदूंवर सतत भयानक हल्ले होत आहेत," असे भाजपने आपल्या पोस्टमध्ये म्हटले. यासोबतच मुर्शिदाबादमध्ये गेल्या वर्षी झालेल्या हरगोबिंद दास आणि चंदन दास यांच्या हत्येची आठवण करून देत, परिस्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे भाजपने नमूद केले.