युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2025 18:55 IST2025-07-13T18:53:44+5:302025-07-13T18:55:30+5:30
Hindu in Bangladesh: या घटनेनंतर देशभरात विद्यार्थ्यांनी तीव्र निदर्षणे केली.

युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
Hindu in Bangladesh: बांग्लादेशात शेख हसीना यांचे सरकार कोसळल्यानंतर मोहम्मद युनूस यांचे सरकार आले. तेव्हापासून सातत्याने हिंदूंवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. आता राजधानी ढाका येथे हिंदू व्यावसायिक लाल चंद सोहाग यांची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हत्येनंतर हल्लेखोर मृतदेहावर नाचले. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर देशभर संतापाची लाट पसरली आहे.
खंडणीसाठी हत्या
मिळालेल्या माहितीनुसार, ढाका येथील मिटफोर्ड हॉस्पिटलमधील सर सलीमुल्ला मेडिकल कॉलेजसमोर बुधवारी (९ जुलै) भयानक हत्या घडली. सोहाग 'सोहाना मेटल' नावाचे भंगाराचे दुकान चालवायचे. व्यवसाय चांगला चालत होता, त्यामुळेच परिसरातील महमूदुल हसन मोहिन आणि सरवर हुसेन टीटू यांनी त्यांच्या व्यवसायात ५० टक्के हिस्सा किंवा खंडणीची मागणी केली. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून आरोपी खंडणीसाठी सोहाग यांना त्रास देत होते.
हत्येचा व्हिडिओ व्हायरल
आरोपींनी बुधवारी सोहाग यांना एकटे गाठले अन् चार-पाच साथीदारांच्या मदतीने त्यांच्यावर हल्ला केला. सोहाग यांना नग्न करुन दगडाने बेदम मारहाण करण्यात आली. यामुळे त्यांच्या डोक्याला आणि शरीराच्या इतर भागांना गंभीर मार लागला. या मारहाणीत सोहाग यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेदरम्यान, परिसरातील लोकांनी बघ्यांची भूमिका घेतली. भीतीपोटी कोणीही आरोपींना रोखण्याचा प्रयत्न केला नाही. या हत्येचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.
विद्यार्थ्यांनी रस्त्यावर निदर्शने केली
ढाकामधील अनेक विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांनी शनिवारी या घटनेचा निषेध केला. ब्रॅक विद्यापीठ, ईस्ट वेस्ट विद्यापीठ, एनएसयू आणि सरकारी ईडन कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी रॅली काढली, तर व्हिडिओ व्हायरल होताच ढाका विद्यापीठ आणि जगन्नाथ विद्यापीठात निदर्शने सुरू झाली.
पोलिसांची कारवाई, ७ आरोपींना अटक
ढाका पोलिसांनी हत्येप्रकरणी ७ जणांना अटक केली आहे, त्यापैकी दोघांकडे बेकायदेशीर शस्त्रे देखील आढळली. लाल चंद यांची बहीण मंजुआरा बेगम (४२) हिने कोतवाली पोलिस ठाण्यात हत्येची तक्रार दिली, ज्यात १९ जणांची नावे आहेत.