धोक्याची घंटा? फक्त 15 महिन्यांत हेक्टोरिया ग्लेशियर 25 किलोमीटरपर्यंत वितळली, वैज्ञानिक चिंतेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 18:21 IST2025-11-18T18:20:57+5:302025-11-18T18:21:58+5:30
Hektoria Glacier Antarctic 2022 मध्ये या ग्लेशियरचा मोठा भाग तुटून वेगळा झाला होता.

धोक्याची घंटा? फक्त 15 महिन्यांत हेक्टोरिया ग्लेशियर 25 किलोमीटरपर्यंत वितळली, वैज्ञानिक चिंतेत
Hektoria Glacier Antarctic : अंटार्क्टिकाच्या हेक्टोरिया ग्लेशियरने वैज्ञानिकांना धक्का दिला आहे. अवघ्या 15 महिन्यांत हा ग्लेशियर तब्बल 25 किलोमीटरपर्यंत मागे सरकला(वितळली). शास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केले की, हीच घटना इतर ग्लेशियरबाबती घडू शकते आणि त्यामुळे समुद्राची पातळी वाढण्याची भीती आहे.
हेक्टोरिया ग्लेशियरसोबत नेमके काय घडले?
2022 च्या सुरुवातीला ग्लेशियरसमोरील मोठा सागरी बर्फखंड तुटून वेगळा झाला. यामुळे ग्लेशियरचा तरंगता भाग (आइस टंग) पूर्णपणे कोसळला. आधार नाहीसा होताच ग्लेशियर अधिक वेगाने वितळू लागला आणि मागे सरकू लागला. सर्वात मोठी हानी नोव्हेंबर-डिसेंबर 2022 मध्ये झाली, जेव्हा ग्लेशियर एकाच महिन्यात 8 किमी मागे हटला. सतत कोसळणाऱ्या हिमखंडांमुळे भूकंपासारखे कंपन निर्माण झाले, ज्याला शास्त्रज्ञांनी ‘ग्लेशियल अर्थक्विक’ असे नाव दिले आहे.
वितळण्याचा वेग इतका जास्त का?
कोलोराडो बोल्डर विद्यापीठातील नाओमी ओचवाट आणि त्यांच्या टीमने केलेल्या अभ्यासानुसार, ग्लेशियरचा मुख्य (ट्रंक) भाग पातळ होत जाऊन सपाट समुद्री तळावर (आइस प्लेन) पोहोचला. हा भाग आधी जमिनीला टेकलेला होता, पण पातळ झाल्यामुळे तो तरंगू लागला. त्यामुळेच बर्फाचे प्रचंड तुकडे मोठ्या वेगाने तुटू लागले आणि संपूर्ण ग्लेशियर झपाट्याने मागे हटला. या टीममधील सदस्य टेड स्कॅम्बोस यांनी या घटनेला “धक्कादायक” म्हणत इशारा दिली की, अशाप्रकारे पाइन आयलंड किंवा थ्वाइट्ससारखे मोठे ग्लेशियरही कोसळण्याची शक्यता वाढली आहे.

शास्त्रज्ञांमध्ये मतभेद
या अभ्यासावर काही तज्ज्ञांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
फ्रेजर क्रिस्टी (एअरबस डिफेन्स अँड स्पेस): सॅटेलाइट डेटातून स्पष्ट होत नाही की, ग्लेशियरचा कोणता भाग प्रत्यक्ष जमिनीला टेकलेला होता.
डॉ. एना हॉग (युनिव्हर्सिटी ऑफ लीड्स): यांच्या डेटानुसार आइस प्लेनचा भाग आधीपासूनच तरंगत होता, त्यामुळे ही ‘सामान्य हिमखंड तुटण्याची प्रक्रिया’ आहे.
डॉ. क्रिस्टीन बॅचलर (न्यूकॅसल युनिव्हर्सिटी): जर तरंगता भाग आधीपासून पाण्यावर होता, तर ही घटना विशेष नाही; हा केवळ आइस शेल्फ तुटण्याचा सामान्य प्रकार आहे.
भविष्यासाठी मोठा इशारा
हेक्टोरिया हा आकाराने छोटा ग्लेशियर आहे. साधारण फिलाडेल्फिया शहराएवढा. पण जर अशीच प्रक्रिया मोठ्या ग्लेशियरमध्ये घडली, तर जागतिक समुद्र पातळी वेगाने वाढू शकते, जे जगभरातील किनारी भागांसाठी धोकादायक आहे. शास्त्रज्ञांच्या मते हवामान बदलामुळे अंटार्क्टिकातील बर्फ अभूतपूर्व वेगाने वितळत आहे. हेक्टोरिया ग्लेशियरची घटना भविष्यातील संभाव्य आपत्तीचा गंभीर इशारा आहे. हा अभ्यास नेचर जिओसायन्स जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला असून, जगभरातील वैज्ञानिक आता अधिक सॅटेलाइट डेटा गोळा करून या घटनेची सखोल चौकशी करत आहेत.