थोडी सभ्यता बाळगा! विमानतळावर पायजमा-स्लिपर घालून येऊ नका! अमेरिकेत निघाला ट्रम्प सरकारचा फतवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 18:24 IST2025-11-25T18:24:16+5:302025-11-25T18:24:41+5:30
अमेरिकेचे परिवहन मंत्री शॉन डफी यांनी हवाई प्रवासादरम्यान प्रवाशांच्या पेहराव आणि वर्तनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

थोडी सभ्यता बाळगा! विमानतळावर पायजमा-स्लिपर घालून येऊ नका! अमेरिकेत निघाला ट्रम्प सरकारचा फतवा
अमेरिकेत आता डोनाल्ट ट्रम्प सरकारने एक फतवा काढला आहे. विमानतळावर येताना पायजमा-स्लिपर घालून येऊ नका, असे एक अनपेक्षित आणि थेट आवाहन करण्यात आले आहे.
अमेरिकेचे परिवहन मंत्री शॉन डफी यांनी हवाई प्रवासादरम्यान प्रवाशांच्या पेहराव आणि वर्तनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 'थँक्सगिव्हिंग' सुट्ट्यांच्या निमित्ताने सर्वाधिक गर्दीच्या हंगामाच्या तोंडावर डफी यांनी लोकांना विमानतळावर पायजमा आणि स्लिपर्स घालून न येण्याची विनंती केली आहे.
सध्या एअर ट्रॅव्हलमध्ये प्रवाशांचे वर्तन आणि पेहराव सभ्यतेला धरून नाहीत. सर्व बेशिस्त होत चालले आहेत. यामुळे लोकांनी विमानतळांवर स्लिपर्स आणि पायजमा घालून येऊ नये, असे स्पष्टपणे त्यांनी बजावले आहे. हवाई प्रवासादरम्यान आता शिष्टाचार परत आणण्याची वेळ आली आहेृ, असे ते म्हणाले.
याचबरोबर बूट काढून उघड्या पायांनी आसनव्यवस्थेवर पाय ठेवणाऱ्या प्रवाशांवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एकमेकांना मदत करावी, शारीरिकदृष्ट्या सक्षम असलेल्यांनी इतर प्रवाशांचे सामान वरच्या कप्प्यात ठेवण्यास मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
सर्वाधिक व्यस्त हंगाम
डफी यांनी सांगितले की, यावर्षीचा 'थँक्सगिव्हिंग'चा आठवडा अमेरिकेतील हवाई प्रवासाच्या इतिहासातील सर्वात व्यस्त हंगाम असेल. या आठवड्यात सुमारे ३.१ कोटी लोक विमानप्रवास करण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रवाशांना शिस्तबद्ध आणि सभ्यतेचे पालन करण्याची आठवण करून दिली आहे.