हाफिज सईदची मोठी खेळी! पाकिस्तानात उघडताहेत महिला दहशतवाद्यांचे दोन ट्रेनिंग सेंटर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 16:38 IST2026-02-19T16:37:10+5:302026-02-19T16:38:09+5:30
जैश-ए-मोहम्मदपाठोपाठ आता 'लश्कर-ए-तैयबा' या कुख्यात संघटनेनेही स्वतःची महिला शाखा स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे.

हाफिज सईदची मोठी खेळी! पाकिस्तानात उघडताहेत महिला दहशतवाद्यांचे दोन ट्रेनिंग सेंटर
काश्मीर खोऱ्यात भारतीय सैन्याच्या वाढत्या दबावामुळे आणि चोख प्रत्युत्तरामुळे धास्तावलेल्या पाकिस्तानीदहशतवादी संघटनांनी आता आपला मोर्चा महिलांकडे वळवला आहे. जैश-ए-मोहम्मदपाठोपाठ आता 'लश्कर-ए-तैयबा' या कुख्यात संघटनेनेही स्वतःची महिला शाखा स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे, या महिला दहशतवाद्यांना तयार करण्यासाठी पाकिस्तानात दोन खास मरकज अर्थात प्रशिक्षण केंद्रे उभारले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
लश्करची रणनीती बदलली
आतापर्यंत लश्कर-ए-तैयबा आपल्या महिला विंगचा वापर केवळ राजकीय प्रचार आणि संघटना वाढवण्यासाठी करत होते. मात्र, आता त्यांना थेट दहशतवादी कारवायांमध्ये उतरवण्याचा घाट घातला जात आहे. लश्करची महिला विंग प्रमुख इफ्फत सई हिने अलीकडेच केलेल्या विधानांवरून या बदलेल्या रणनीतीचे संकेत मिळत आहेत. या केंद्रांमध्ये महिलांना केवळ कट्टरतावादाचे धडे दिले जाणार नाहीत, तर त्यांना ओव्हर ग्राउंड वर्कर म्हणून कसे काम करायचे, याचेही प्रशिक्षण दिले जाणार आहे.
इस्लामाबादमध्ये हालचालींना वेग
मिळालेल्या माहितीनुसार, लश्करचा वरिष्ठ नेता अब्दुर रऊफ याने नुकताच इस्लामाबादमधील 'मरकज कुबा अल इस्लाम' या केंद्राला भेट दिली. या केंद्राचा विस्तार केला जात असून, तिथे महिलांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण सुविधा जोडण्यात येत आहेत. यामुळे भारतीय सुरक्षा यंत्रणांचे लक्ष या हालचालींकडे वळले असून सीमावर्ती भागात दक्षता वाढवण्यात आली आहे.
जैशच्या पावलावर पाऊल
काही काळापूर्वी जैश-ए-मोहम्मदने 'ऑपरेशन सिंदूर'नंतर आपली महिला विंग सक्रिय केली होती. या विंगची धुरा जैशचा म्होरक्या मसूद अजहरची बहीण सांभाळत आहे. आता हाफिज सईदच्या लश्करनेही तोच मार्ग निवडला आहे. प्रत्यक्षात, भारतीय सुरक्षा दलांच्या धास्तीने हाफिज सईद आणि मसूद अजहर हे दोन्ही दहशतवादी सध्या भूमिगत आहेत. त्यांच्यावर अमेरिकेने प्रत्येकी १०-१० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. स्वतःच्या कारवाया पडद्यामागून सुरू ठेवण्यासाठी त्यांनी महिलांना पुढे करण्याची ही नवी चाल खेळल्याचे बोलले जात आहे.
भारतासाठी काय आहे धोका?
महिलांचा वापर प्रामुख्याने शस्त्रास्त्रांची ने-आण करण्यासाठी, रेकी करण्यासाठी आणि छुप्या पद्धतीने माहिती पुरवण्यासाठी केला जाऊ शकतो. महिलांवर संशय कमी येतो, याच गोष्टीचा फायदा उठवण्याचा या दहशतवादी संघटनांचा प्रयत्न आहे. मात्र, भारतीय गुप्तचर संस्था आणि सुरक्षा दले या नव्या धोक्याचा सामना करण्यासाठी सज्ज झाली आहेत.