हाफिज सईद पाकिस्तानात नाही? नेमका कुठे लपून बसलाय तोयबाचा म्होरक्या? 'या' व्यक्तव्यांमधून मिळाले मोठे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 13:59 IST2025-07-07T13:01:51+5:302025-07-07T13:59:38+5:30
काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्यापासून हाफिज सईद गुडूप झाला आहे. मात्र, तो सध्या कुठे आहे? हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.

हाफिज सईद पाकिस्तानात नाही? नेमका कुठे लपून बसलाय तोयबाचा म्होरक्या? 'या' व्यक्तव्यांमधून मिळाले मोठे संकेत
'लष्कर-ए-तोयबा' या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफिज सईद हा पाकिस्तान असल्याचे भारताने वारंवार म्हटले आहे. भारतात त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. मुंबईत झालेल्या २६/११ या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड हाफिज सईदच होता. मात्र, हाफिज पाकिस्तानात असल्याचे पाकिस्तानी नेत्यांनी वेळोवेळी नाकारले आहे. काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्यापासून हाफिज सईद गुडूप झाला आहे. मात्र, तो सध्या कुठे आहे? हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.
नुकतेच पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी, 'भारताने ठावठिकाणा सांगावा, आम्ही हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू' असे म्हटले होते. तेव्हापासून चर्चांना उधाण आले आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मुरीदके हा सईद हाफिज याचा तळ मानला जातो. ऑपरेशन सिंदूरमध्ये याच तळावर हल्ला करून ते उद्ध्वस्त करण्यात आले होते. तेव्हापासून सईद हाफिज हा भूमिगत झाला आहे.
'त्या' ३ वक्तव्यांमध्ये मोठे संकेत!
> ऑपरेशन सिंदूर दरम्यान, १२ मे रोजी, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी बीबीसी उर्दूला एक मुलाखत दिली. ख्वाजा यांनी या मुलाखतीत म्हटले की, पूर्वी पाकिस्तानमध्ये दहशतवाद फोफावत होता. सरकारने अमेरिका आणि युरोपच्या इशाऱ्यावरून दहशतवाद्यांना पाठिंबा दिला होता, परंतु आता पाकिस्तानमध्ये एकही दहशतवादी नाही. ख्वाजा म्हणाले होते की, मी खात्रीने सांगू शकतो की सध्या पाकिस्तानमध्ये एकही दहशतवादी नाही.
> ५ जुलै २०२५ रोजी अल-जझीराला दिलेल्या मुलाखतीत, पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री आणि खासदार बिलावल भुट्टो झरदारी म्हणाले की, "हाफिज सईद सध्या कुठे आहे हे मला माहीत नाही. मला वाटते की, हाफिज सध्या अफगाणिस्तानात असेल." अफगाणिस्तान हा पाकिस्तानचा शेजारी देश आहे. दोघांमधील सीमा सुमारे २६०० किमी आहे.
> हाफिज सईदचा मुलगा तल्हा सईदने ६ जुलै रोजी त्याच्या वडिलांबद्दल सांगितले. तल्हा म्हणाला की, "माझे वडील सुरक्षित ठिकाणी आहेत आणि आता त्यांची तब्येतही चांगली आहे."
आता प्रश्न असा आहे की, हे सुरक्षित ठिकाण पाकिस्तानच्या बाहेर आहे की आत? याची कल्पना कुणालाही नाही.
हाफिजवर १० दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस!
२०१५मध्ये अमेरिकेने हाफिज सईदवर १ कोटी डॉलर्सचे बक्षीस ठेवले होते. एका मुलाखतीत हाफिज म्हणाला होता की, "माझ्यावर बक्षीस ठेवण्यात आले आहे, पण कोणीही माझे गुप्त ठिकाण उघड करत नाही. इथल्या लोकांना १ कोटी डॉलर्स नको आहेत."
२०१९ मध्ये, हाफिज सईदला पाकिस्तानी सरकारने नजरकैदेत ठेवले होते, परंतु लवकरच त्याची सुटका करण्यात आली. गेल्या ५ वर्षांत हाफिज पाकव्याप्त काश्मीर आणि पंजाब प्रांतात अधिक सक्रिय असल्याचे दिसून आले आहे.