गुजरातच्या बाप-लेकीची अमेरिकेत हत्या; दुकान बंद असल्याने दारू न मिळाल्याने झाडल्या गोळ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 15:49 IST2025-03-23T15:45:30+5:302025-03-23T15:49:36+5:30
अमेरिकेत भारतीय बाप लेकीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

गुजरातच्या बाप-लेकीची अमेरिकेत हत्या; दुकान बंद असल्याने दारू न मिळाल्याने झाडल्या गोळ्या
Crime News: अमेरिकेत भारतीयांच्या हत्येचे सत्र सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. अमेरिकेतील व्हर्जिनियामध्ये एका गुजराती व्यक्तीची आणि त्याच्या मुलीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यामध्ये ५६ वर्षीय प्रदीप पटेल आणि त्यांची २४ वर्षीय मुलगी उर्मी पटेलचा मृत्यू झाला. एका आफ्रिकन-अमेरिकन व्यक्तीने क्षुल्लक कारणावरुन दोघांवरही गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात प्रदीत पटेल जागीच मृत्यूमुखी पडले तर उर्मी पटेलचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली आहे.
२० मार्चला सकाळी प्रदीप पटेल आणि त्यांची मुलगी उर्मी त्यांचे दुकान उघडण्यासाठी गेले तेव्हा हा सगळा प्रकार घडला. प्रदीप पटेल यांनी दुकान उघडताच एक व्यक्ती आत शिरला आणि त्यांच्यावर गोळ्या झाडायला सुरुवात केली. जॉर्ज फ्रेझियर डेव्हन व्हार्टन असे हल्लेखोराचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. या हल्ल्यात प्रदीप यांचा जागीच मृत्यू झाला, तर उर्मीचा दोन दिवसांनी रुग्णालयात मृत्यू झाला.
आरोपी दारू खरेदी करण्यासाठी रात्रभर पटेल यांच्या डिपार्टमेंटल स्टोअर बाहेर फेऱ्या मारत होता. प्रदीप आणि उर्मी तिथे पोहोचल्यावर आरोपीने त्यांना दुकान का बंद आहे असं विचारलं. रात्रभर थांबायला लागल्याने आरोपी दोघांवर संतापला होता. दुकान उघडताच रागाच्या भरात आरोपी जॉर्जने दोघांवर गोळीबार केला. प्रदीप यांना दोन गोळ्या लागल्या, तर उर्मीला एक गोळी लागली.
सहा वर्षांपूर्वी प्रदीपभाई आणि त्यांची पत्नी हंसाबेन त्यांची धाकटी मुलगी उर्मीसोबत व्हिजिटर व्हिसावर अमेरिकेला गेले होते. काही काळानंतर या कुटुंबाने व्हर्जिनियाच्या अकोमॅक काउंटीमध्ये डिपार्टमेंटल स्टोअर उघडले. उर्मीचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. उर्मीचा अंत्यसंस्कार अमेरिकेतच होणार असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
दरम्यान, भारतीय वंशाच्या एका महिलेने कॅलिफोर्निया येथे पोटच्या ११ वर्षीय मुलाची निर्घृणपणे हत्या केली. आरोपी महिला सरिता डिस्नेलँडमध्ये मुलासोबत फिरण्यासाठी गेली होती. डिस्नेलँडमध्ये तीन दिवस घालवल्यानंतर महिलेने हॉटेलमध्ये चाकूने मुलाचा गळा चिरला. या घटनेनंतर पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. मुलाचा ताबा त्याच्या वडिलांकडे गेल्याने महिला नाराज होती आणि त्यातूनच तिने हे धक्कादायक कृत्य केलं.