ग्रीन कार्डचं डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून समर्थन; भूमिपुत्रांच्या हितासाठी योग्य निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 06:52 IST2020-06-25T02:00:21+5:302020-06-25T06:52:05+5:30
अमेरिकेच्या भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळवून देण्यासाठी हा निर्णय आवश्यक होता, असे त्यांनी म्हटले आहे.

ग्रीन कार्डचं डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून समर्थन; भूमिपुत्रांच्या हितासाठी योग्य निर्णय
वॉशिंग्टन : ३१ डिसेंबरपर्यंत ग्रीन कार्ड जारी करणे स्थगित करण्याच्या निर्णयाचे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जोरदार समर्थन केले आहे. अमेरिकेच्या भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळवून देण्यासाठी हा निर्णय आवश्यक होता, असे त्यांनी म्हटले आहे.
ग्रीन कार्ड देणे ९० दिवसांसाठी स्थगित करण्याचा कार्यकारी आदेश ट्रम्प यांनी एप्रिलमध्ये काढला होता. सोमवारी या आदेशाला ३१ डिसेंबर २०२०पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय ट्रम्प यांनी जाहीर केला. मंगळवारी सॅन लुईस येथे पत्रकारांनी त्यांना या मुद्द्यावर छेडले. त्यावेळी त्यांनी सांगितले की, आता या क्षणी आम्ही अमेरिकी भूमिपुत्रांना नोकºया देऊ इच्छितो. म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. कोविड-१९ साथीमुळे लक्षावधी अमेरिकी नागरिकांचा रोजगार गेला आहे. त्यांना मदत करण्यासाठी पावले उचलणे आवश्यक होते.
येत्या ३ नोव्हेंबर रोजी अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक होत असून, ट्रम्प हे दुसºया कार्यकाळासाठी नशीब अजमावत आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी भूमिपुत्रांना नोकºया देण्याचा मुद्दा काढला असल्याचे मानले जात आहे. ट्रम्प यांनी म्हटले की, फेब्रुवारी आणि मे २०२० या काळात अमेरिकेतील बेरोजगारीचा दर जवळपास चौपट झाला आहे. अतिशय उच्च बेरोजगारीच्या दरापैकी हा एक आहे. ग्रीन कार्ड जारी करण्यास स्थगिती देण्यात आल्यामुळे भारतीय तंत्रज्ञान व्यावसायिकांसाठी नागरिकत्व मिळण्याची प्रतीक्षा वाढली आहे.
>अमेरिकी व्यवसायाला फटका बसणार
एच-१बी आणि इतर कामकाजी व्हिसाला तात्पुरती स्थगिती देण्याच्या ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयाचा विदेशी कामगारांवर अवलंबून असलेल्या अमेरिकी व्यवसायांना फटका बसेल, असा इशारा अमेरिकी खासदारांनी दिला आहे. एच-१ बी आणि इतर सर्व कामकाजी व्हिसा २0२0च्या अखेरपर्यंत निलंबित करण्याचा आदेश राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी जारी केला आहे.
काँग्रेस सभागृहाच्या सदस्य तथा आशिया प्रशांत अमेरिकी कॉकसच्या अध्यक्ष ज्युडी चू यांनी सांगितले की, अमेरिकेत आशियातून उच्च कौशल्यधारक कर्मचारी येतात. त्यावर या निर्णयाचा प्रतिकूल परिणाम होईल. हा पूर्वग्रहदूषित आणि कट्टरवादी अजेंडा असून, त्याचा आपल्या देशहिताला फटका बसेल.