भीतीकडे पाठ नको, सामोरे जा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 11:36 IST2026-01-04T11:36:01+5:302026-01-04T11:36:27+5:30
भूकंपानंतर लागलेल्या आगीत टोकियो शहर जवळजवळ भस्मसात झाले.

भीतीकडे पाठ नको, सामोरे जा!
महेंद्र तेरेदेसाई, लेखक-दिग्दर्शक
जपानच्या इतिहासातील अत्यंत भीषण घटना म्हणून ओळखला जाणारा ग्रेट कांतो भूकंप १ सप्टेंबर १९२३ रोजी झाला. या भूकंपात दीड लाखांहून अधिक लोकांचा बळी गेला. अकीरा ज्या यामानोते डोंगर परिसरात राहत होता, तिथे त्या दिवशी सारे दिवे गेले होते. भूकंपानंतर लागलेल्या आगीत टोकियो शहर जवळजवळ भस्मसात झाले.
या अराजकातून तिथल्या राजकारणातील लांडग्यांनी संधी साधली आणि निर्वासित कोरियन लोकांवर अमानुष सूड उगवला. खरी असो वा पेरलेली—भीती माणसाला माणुसकीपासून किती दूर नेते, याचे ते जिवंत उदाहरण होते. अकीराने हा वेडापिश्या जमावाचा उन्माद प्रत्यक्ष पाहिला होता. तो घरी दडून बसला होता.
विध्वंस ओसरल्यानंतर मोठा भाऊ हेगो त्याच्याकडे आला. त्याने अकीराचा हात धरून त्याला बाहेर काढले. उद्ध्वस्त शहरातून फेरफटका मारायचा आहे, एवढेच तो म्हणाला. अकीराने विरोध केला; पण हेगो ठाम होता.
टोकियोच्या दिशेने चालताना प्रथम जळालेली प्रेते दिसली—काही अर्धवट, काही पूर्ण. माणसांची, जनावरांची. पुढे जाताना दृश्य अधिक भयाण होत गेले. एका उंचीवरून अकीराला खाली पसरलेले लाल वाळवंट दिसले—जळून करडे झालेले शहर. सुमिदगावा नदीत वाहत असलेली जळकी प्रेते पाहून त्याचे पाय थरथरले. तो कोसळणार, तोच हेगोने त्याला उभे केले—“नीट बघ अकीरा, नीट बघ.”
डोळे उघडे ठेवून पाहताना हळूहळू भीती मावळू लागली. रक्ताने लाल झालेल्या नदीकाठी उभा असताना त्याला बुद्धाच्या नरकातील लाल तळ्याचे वर्णन आठवले. काही प्रेते फुगलेली होती; काही बायकांच्या पाठीवर मृत मुले होती. त्या निष्प्राण दृश्यात फक्त दोनच गोष्टी हालत होत्या—पाण्यावर तरंगणारी प्रेते आणि काठावर उभी असलेली ही दोन भावंडे.
घरी परतल्यावर अकीराला वाटले, रात्रभर झोप येणार नाही. पण गादीवर पडताच तो गाढ झोपला. कारण हेगोने त्याला भीतीकडे पाठ फिरवायला नव्हे, तर तिला सामोरे जायला शिकवले होते. “डोळे बंद केले तर भीती आयुष्यभर राहते; डोळे उघडे ठेवले तर तिच्यावर विजय मिळतो,” असे हेगोचे म्हणणे होते.
‘समथिंग लाइक ऑटोबायोग्राफी’ या आत्मचरित्रात अकीरा कुरुसोवाने हा अनुभव प्रथमपुरुषी सांगितला आहे. दीड तपापूर्वी हे पुस्तक वाचले तेव्हा जे उमगले, त्याहून वेगळे अर्थ आज उमटतात. कदाचित हीच अभिजात साहित्याची खरी ओळख असावी - प्रत्येक वाचनात नवे अर्थ देणारी.