भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 22:46 IST2025-05-01T22:45:44+5:302025-05-01T22:46:28+5:30
या करारामुळे सागरी क्षेत्रातील भारताची शक्ती वाढेल. तसेच सध्याच्या आणि भविष्यातीलही धोक्यांचा सामना करण्याची क्षमता वाढेल...

भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानचे संबंध अधिकच बिघडले आहेत. दोन्ही देशांतील तणाव शिगेला पोहोचला आहे. यातच आता, अमेरिकेने भारताला मोठी मदत करणार निर्णय घेतला आहे. यामुळे पाकिस्तानचे टेन्शन वाढले आहे. अमेरिकन परराष्ट्र विभागाने भारताला इंडो-पॅसिफिक मॅरीटाइम डोमेन अवेयरनेस आणि संबंधित उपकरणांच्या संभाव्य परदेशी लष्करी विक्रीला मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे. याची किंमत अंदाजे १३१ मिलियन डॉलर एवढी आहे. या करारामुळे सागरी क्षेत्रातील भारताची शक्ती वाढेल. तसेच सध्याच्या आणि भविष्यातीलही धोक्यांचा सामना करण्याची क्षमता वाढेल.
अमेरिका-भारताचे धोरणात्मक संबंध अधिक मजबूत होण्यास मदत होईल -
आधिकृत निवेदनानुसार, संरक्षण सुरक्षा सहकार्य संस्थेने या संभाव्य विक्रिसंदर्भात माहिती देताना आवश्यक ते सर्टिफिकेटही प्रदान केले आहे. भारत सरकारने सी-व्हिजन सॉफ्टवेअर, तांत्रिक सहकार्य फील्ड टीम (TAFT) प्रशिक्षणाला मान्यता दिली आहे. रिमोट सॉफ्टवेअर आणि विश्लेषणात्मक समर्थन, सी-व्हिजन डॉक्युमेंटेशनची उपलब्धता आणि बरेच गोष्टींच्या खरेदीची मागणी केली आहे. निवेदनानुसार, “या विक्रीमुळे अमेरिका-भारताचे धोरणात्मक संबंध अधिक मजबूत होण्यास मदत होईल. याशिवाय, इंडो-पॅसिफिक आणि दक्षिण आशिया प्रदेशात राजकीय स्थिरता, शांतता आणि आर्थिक प्रगतीच्या दृष्टीनेही महत्वाची आहे.
भारत आणि पाकिस्तानने तणाव कमी करावा : अमेरिकेचे आवाहन -
दरम्यान, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यासोबत स्वतंत्रपणे फोनवरून संवाद साधला आणि दोन्ही देशांना कोणताही तणावापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला आहे.